भाजपाच्या हातावर तुरी देऊन सत्तेवर आलेली शिवसेना सध्या नव्या मतदाराच्या शोधात आहे. सत्तेचा लोलक आपल्या बाजूला झुकलेला ठेवायचा असेल तर हक्काचा मतदार हवाच. राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे अस्थिर झाल्यामुळे यदाकदाचित निवडणुकांना सामोरे जावे लागले तरी तयारी असावी असा शिवसेनेचा हिशोब असावा.
असंख्य कुरबुरी आणि नाराजी असूनही भाजपा शिवसेनेची युती तब्बल २५ वर्षे टिकली. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कमान हाती घेतल्यानंतर मात्र या कुरबुरींना तंट्याचे स्वरुप आले. मोठा भाऊ ते छोटा भाऊ अशी पदावनती झाल्यामुळे शिवसेनेचा अहंकार दुखावला गेला होता. महत्व कमी झालेल्या शिवसेना नेत्यांना ‘कमळाबाई’समोर नव्या भूमिकेत शिरणे जड होते. त्यामुळे सत्तेत असताना विरोधी पक्षाची भूमिका घेऊन शिवसेना भाजपाला अडचणीत आणत राहिली. सामानातून दुगण्या झाडत राहीली.
२०१९ च्या निवडणुकीत लागलेले निकाल पुन्हा २०१४ च्या विधानसभेनंतर निर्माण झालेली समीकरणे कायम ठेवणार असे चित्र निर्माण झाले असताना शिवसेनेने युतीचा पट उधळून लावत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सोयरीक केली. ही जुळवाजुळव करण्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली. भाजपा शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर येणार असे चित्र स्पष्ट असताना मुख्यमंत्री आमचाच असे राऊत सातत्याने का म्हणतायत याची उकलच भाजपाच्या नेतृत्वाला झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेल्या घट्ट संबधांमुळे संजय राऊत यांना हे समीकरण जुळण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. भाजपाला धोबीपछाड दिल्यानंतर हे आमचे आधीच ठरले होते असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. भाजपाची जिरवत नाही तोपर्यंत आम्ही एकत्र राहणार असे विधान अलिकडेच काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यात परस्पर विरोधी विचारधारा असलेले हे तीन पक्ष एकत्र आले त्यामागे हीच भूमिका होती. राज्यातील भाजपा नेतृत्व याबाबत अखेरपर्यंत अंधारात होते. शिवसेनेवर विश्वास ठेवण्याची किंमत त्यांना चुकवावी लागली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही काळ लोंबकळत ठेवून का होईना शिवसेनेसोबत पाट लावण्यास मंजुरी दिली.
इथून ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणा-या शिवसेनेची नवा मतदार शोधण्याची गरज सरू झाली. २०१४ साली लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव होण्यामागे काँग्रेसची हिंदूविरोधी प्रतिमा कारणीभूत ठरली असा निष्कर्ष काँग्रेस नेते ए.के.एण्टनी यांच्या नेतृत्वाखालील समितीने काढला होता. हिंदू दहशतवादाचे कार्ड खेळून हिंदू समाजाला बदनाम करणे काँग्रेसला जड गेले. त्यामुळे हिंदूविरोधी चेहरा असलेल्या काँग्रेससोबत जाणे शिवसेनेच्या पारंपरीक मतदाराला मानवणार नव्हते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावर जमणारे शिवसैनिकाला हा वैचारीक धक्का होता. काँग्रेसवर होणारा भडीमार आणि शरद पवारांवर होणारी बिनधास्त टीका ऐकून टाळ्यांचा कडकडाट करणा-या शिवसैनिकांना पोस्टरवर सोनिया गांधी आणि पवारांसोबत विराजमान झालेले शिवसेनाप्रमुख कसे मान्य होणार? पक्ष नेतृत्वालाही याची कल्पना होती. परंतु थोडा काळ गेल्यानंतर शिवसैनिक या धक्क्यातून सावरेल असा हिशोब करून शिवसेना नेतृत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेच्या उबदार गोधडीत शिरले. ही नवी सोयरीक भाजपाचे उट्टे काढल्याचे समाधान देणारी होती,
देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर ठेवल्याचा आनंद होताच. मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या ताब्यात आले होते. त्यामुळे काही काळात दुखावलेला मतदार पुन्हा कळपात येईल असे गणित शिवसेनेने मांडले. परंतु सत्ता टिकवण्याच्या नादात हा मतदार सतत दुखावत गेला. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मिरवलेली हिंदुहृदयसम्राट ही बिरुदावली डोळ्यासमोर इतिहास जमा झाल्याचे पाहाणे त्याच्या नशिबी आले. शिवसेनेभोवती कन्हैया कुमार, हार्दीक पटेल, अबू आजमी असा गोतावळा जमा होऊ लागला. शिवसेनाप्रमुखांसमोर बोलती बंद असलेले नवाब मलिक, अबू आजमी यांच्यासारखे दुय्यम दर्जाचे नेते शिवसेनेला दम देत असल्याचे चित्र दर चार दिवसांनी पाहायला मिळू लागले. तुकडे तुकडे गँगच्या नादी लागलेली आणि काँग्रेसच्या आहारी गेलेली नवी शिवसेना लोकांना दिसू लागली. विचारधारेशी काडीचा संबंध नसलेल्या प्रियांका चतुर्वेदी आणि उर्मिला मातोंडकर यांची राज्यसभा आणि विधान परिषदेवर लागलेली वर्णी शिवसेनेने कात टाकल्याचे सुचवत होती.
या गदारोळात आपला हक्काचा मतदार गमावला तर नवा मतदार जोडायला हवा याची जाणीव झाल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने सेक्युलॅरिझमची बांग द्यायला सुरुवात केली. दक्षिण मुंबईत अजान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अजान ऐकून मनाला शांती मिळते, अशी नवी कोरी भूमिका मांडून शिवसेना दक्षिण मुंबईच्या विभागप्रमुखांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना आणि हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिल्याचा पुरावाच दिला. शिवसेनेच्या वडाळा विधानसभेने नववर्षाचे कॅलेंडर उर्दूत छापले. त्यात शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ असा करण्यात आला. ही सगळी कवायत नवी मतपेढी बांधण्यासाठीच होती. फाफडा-जलेबीची चव घोळवत गुजराती मतदारांना साद घालण्यात आली.
राजकीय पक्ष म्हणून मतदारांना जोडणे यात काहीच गैर नाही. शिवसेनेने कोणाला जवळ करावे हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. परंतु हे करत असताना त्यांनी शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या विचारधारेला नारळ दिला हे सपशेल दिसत असून ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा शिवसेना नेतृत्वाने दाखवायला हवा होता. तिथे मात्र दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रकार सुरू होता. आम्हाला भाजपकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, शिवसेनेला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे वारंवार सांगितले जात होते. एकीकडे शिवसेनेच्या फाफडा जिलेबी प्रयोगानंतर शिवसेने सर्वसमावेशक भूमिका घेत असल्याची चर्चा मटा सारखी वृत्तपत्रे करत असताना शिवसेना नेते मात्र सोयीनुसार कधी हिंदुत्ववादी कधी सेक्युलर असा खेळ खेळत होते.
राजकारणाचा खेळ हा सत्तेसाठीच असतो त्याला कोणताही पक्ष अपवाद असू शकत नाही. परंतु सत्तेचा खेळ खेळताना मतदाराला गृहीत धरण्याची चूक कुणी करू नये. शिवसेना नेतृत्व नेमके हीच चूक करते आहे. अजानस्पर्धांचे आयोजन करून शिवसेनेला नवी मतपेढी बांधता येईल का, गुजराती बांधव त्यांच्या फाफडा जलेबी राजकारणाला प्रतिसाद देईल की शिवसेनेची जलेबीबाई होईल, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी महापालिका निवडणुकांपर्यत वाट पाहावी लागेल.