30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरसंपादकीयनव्या युतीच्या फुसकुल्या

नव्या युतीच्या फुसकुल्या

Google News Follow

Related

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात नव्या समीकरणाची कुजबुज सुरू आहे. हे दोन्ही नेते कधी काळी विद्यार्थी संघटनांच्या राजकारणात सक्रीय होते. त्याकाळी विळ्याभोपळ्याचे नाते असलेल्या अभाविप आणि भाविसेच्या राजकारणात दोन्ही नेत्यांनी उमेदीची अनेक वर्षे काढली. दोघांच्या ताज्या भेटीनंतर भाजपा-मनसेच्या युतीबाबत चर्चेने पुन्हा जोर धरलाय.

शिवसेनेशी युती तुटल्या दिवसापासून भाजपा मनसेसोबत जाणार अशी चर्चा सुरू होती. राज ठाकरे यांच्या बहुचर्चित गुजरात भेटीनंतर या चर्चेला बळ मिळाले होते. परंतु ही युती कधी प्रत्यक्षात आलीच नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा ‘लाव रे तो व्हीडीयो’, हा प्रयोग गाजला. त्यांनी प्रचंड गर्दीच्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी टीका केली. राज यांच्या सभेला झालेल्या गर्दीतून काँग्रेस आणि शरद पवारांना काही लाभ झाला नसला तरी नजीकच्या काळात राज ठाकरे भाजपा सोबत जातील याची शक्यता संपुष्टात आली.

परंतु राजकारणात अशक्य काहीच नसते. काँग्रेससोबत आघाडी करून शिवसेनेने हे सिद्ध केले आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपा कधी एकत्र येऊच शकत नाही, असा दावा कोणी करू नये. राज ठाकरे यांचे भाजपाच्या अनेक वरीष्ठ नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. जेव्हा भाजपाचा एखादा तालेवार नेता राज ठाकरे यांना भेटतो तेव्हा नव्या युतीची कुजबुज पुन्हा जोर धरते. काही काळानंतर ओसरते.

चंद्रकांतदादा आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नव्याने सुरू झालेल्या या चर्चेला आगामी पालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेत मोठा राजकीय संघर्ष पेटलाय. ‘पोपटाचा प्राण पालिकेच्या तिजोरीत आहे’, याची जाण असल्यामुळे शिवसेनेकडून मुंबई महापालिका हिसकावून घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ही लढाई जिंकण्यासाठी ज्या अनेक कसरती सुरू आहेत, त्यात मनसेबाबात सुरू असलेली चाचपणी हा एक भाग असू शकते.

राजकारणात दोन अधिक दोनचे उत्तर तीन किंवा पाचही असू शकते. भाजपा आणि मनसेची युती झालीच तर फायद्याचे गणित लक्षात घेऊनच होईल. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. शिवसेनाप्रमुखांनंतर त्यांच्या आसनावर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले असले तरी बाळासाहेबांच्या वक्तृत्वाचा वारसा मात्र राज ठाकरेंकडे आला आहे. हाताशी केवळ एक आमदार असूनही मराठी जनमानसावर त्यांचा प्रभाव आहे. या बलस्थानांचा आगामी महापालिका निवडणुकात पक्षाला फायदा होईल असे मानणारा एक गट भाजपामध्ये आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, भाजपाच्या विरोधात प्रचाराचा धुरळा उडवणाऱ्या राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकांची समीकरणे जुळवताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यासारखे बाजूला ठेवले. राज्यात सत्तेचे नवे गणित जुळवताना शरद पवारांना मनसेची आठवणही आली नाही. जिथे उद्धव ठाकरे आहेत, तिथे सुईच्या अग्रभागा इतकी जमीनही मिळणार नाही, याची जाणीव राज ठाकरे यांना आहे. त्यामुळे नवी सोयरीक जुळवण्याकडे त्यांचा कल असेल तर ते स्वाभाविकही आहे.

परंतु ही नवी सोयरीक भाजपापेक्षा शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता जास्त. ती कदाचित मनसे आणि भाजपाच्याही सोयीची नाही. महापालिका निवडणुकांमध्ये मनसेने स्वतंत्रपणे उमेदवार उतरवले तर त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसेल हे सरळ गणित आहे. कारण मनसे आणि शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र बऱ्यापैकी सारखे आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत ‘काँटे की टक्कर’ असल्यामुळे जय-पराजयातले अंतर फार मोठे असणार नाही. मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या बाजूला मनसेशी युतीच्या चर्चेमुळे भाजपामधील उत्तर भारतीयांमध्ये चलबिचल आहे. काही वर्षापूर्वी कल्याण स्टेशनवर रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीची जखम त्यांच्या मनात अजूनही ठसठसते आहे. मुंबईत उत्तर भारतीयांचा टक्का लक्षणीय आहे. पंतप्रधान मोदींमुळे ही मतं हमखास भाजपाच्या पदरात पडतात. परंतु मनसेशी युती झाली तर ही मतं भाजपाला मिळण्याची शक्यता धुसर होईल.
त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. भाजपाच्या दृष्टीने ही निवडणूक लोकसभा निवडणुकींची रंगीत तालिम आहे. महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपा एकत्र आले तर काँग्रसच्या हाती उत्तर प्रदेशात धुरळा उडवण्यासाठी आयतेच कोलीत मिळेल. भाजपाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशच्या निवडणुका महापालिकेच्या तुलनेत अधिक महत्वाच्या आहेत.

कोरोना महामारी, त्यानंतरचा लॉकडाऊन, रेल्वे बंदी, भ्रष्टाचार, पूर परीस्थितीत मुंबईकरांकडे केलेले दुर्लक्ष आदी अनेक मुद्द्यांमुळे शिवसेनेच्या विरोधात आणि भाजपाच्या बाजूने मुंबई ठाण्यात कधी नव्हे असे अनुकूल वातावरण आहे. कार्यकर्तेही शिवसेनेसोबत हिशोब चुकते करण्यासाठी निवडणुकीची वाट पाहाताय. एनसीपी आणि शिवसेना निवडणुकीत एकत्र लढणार हे आता जवळजवळ निश्चित आहे, काँग्रेस ‘एकला चालो रे’, चा राग आलापते आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत भाजपाने आपला मतदार एकत्रित बांधून व्यवस्थित रणनीती आखल्यास शिवसेनेला निवडणूक जड जाऊ शकते. ८२ वरून ११४ चा टप्पा गाठणे भाजपासाठी सोपे नसले तरी सद्य स्थितीत अशक्यही नाही. परंतु त्यासाठी कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मनसेशी युतीची चर्चा भाजपाला नेमकी त्याच गोंधळाच्या दिशेने नेते आहे. भाजपाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना, समर्थकांना ही युती नको आहे. मानेवर नव्या युतीचे जोखड घेण्याची त्यांची तयारी नाही.

उत्तर प्रदेशसारख्या देशाच्या सर्वात मोठ्या राज्यात स्वबळावर सत्ता मिळवल्यानंतर भाजपाला महाराष्ट्रासारख्या राज्यात मित्रपक्षाची गरज का भासावी असा त्यांचा प्रश्न आहे. परंतु भाजपा नेतृत्व याबाबत वेगळा विचार करू शकते. २५ वर्षे शिवसेनेशी केलेली युती इतक्या वाईट वळणावर संपुष्टात आल्यानंतर भाजपाचे नेतृत्व अजून त्याच आत्मघाती मार्गाने जात असेल तर त्यांना शुभेच्छा दिलेल्या बऱ्या.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा