विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक असे विधान केले आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येऊन निवडणुका लढणार का? या चर्चांवर फडणवीसांनी एक प्रकारे चित्र स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. त्याआधी नाशिक येथे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. त्यामुळे भाजपा आणि मनसे या दोन पक्षांची युती होणार का या चर्चांना उधाण आले होते.
पण आता देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात होते. पुण्यात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर माध्यमांची संवाद साधला. माध्यमांकडून त्यांना भाजपा आणि मनसे युती बाबत प्रश्न विचारला गेला असता फडणवीसांनी दिलखुलास असे उत्तर दिले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार नसल्याबद्दल फडणविसांनी इशारा केला आहे का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
हे ही वाचा:
जेष्ठ संघ प्रचारकांचा सन्मान…टपाल खात्याने प्रकाशित केले टपाल तिकीट
नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!
दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले आहे.