जुलैच्या मध्यात मुंबई आणि उपनगरांना पावसाने झोडपले होते. मुंबईतील चेंबूर वाशीनाका, विक्रोळी आणि भांडूप या परिसरांत १८ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून ३२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या अपघाताचे तीव्र पडसाद उमटले.
घडलेल्या घटनेला अनेक दिवस होऊन गेले तरी पालिका प्रशासनाने उपाययोजनांसाठी कुठलेही ठोस धोरण तयार केलेले नाही. यापूर्वी झालेल्या दोन्हीही बैठकींमध्ये पालिकेने उपाययोजनांचे कोणतेही धोरण तयार केले नाही. त्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
जुन्या इमारतींचे जसे सर्वेक्षण केले जाते तसेच डोंगराळ भागातील संरक्षक भिंतींचे सर्वेक्षण करून धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. संरक्षक भिंत बांधण्यासाठी संबंधित विभागाकडून निधीची उपलब्धता करणे आवश्यक आहे असे मुद्दे नगरसेवकांनी मांडले.
दरडींच्या परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे. अशी सूचना विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केली. प्रशासनाकडून पुढील बैठकीत उत्तर दिले जाईल; दरडीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी तातडीने धोरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
‘सात दशकात असा महापूर पाहिला नाही’
चीनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
बापरे ! महाराष्ट्रातील पुरांच्या घटनांत झाली आहे इतकी भयंकर वाढ
आदर पुनावाला म्हणून भेटले आरोग्यमंत्र्यांना…
सर्वात जास्त धोकादायक दरडी या भांडूप ‘एस’ आणि विक्रोळी भागात असून या भागात पुन्हा असे अपघात घडू नयेत यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार असा मुद्दाही बैठकीत उठवण्यात आला. यापूर्वीही मालाड येथील पालिकेच्या जलाशयाची भिंत कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला होता. मालाड प्रकरणाच्या दुर्घटनेचा दाखला देत शिंदे यांनी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका केली.