न्यायालयाने ठाकरे सरकारला खडसावले
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असे म्हणत ठाकरे सरकारने मुंबईमध्ये कोरोना निर्बंधांत काहीशी सूट दिली आहे. म्हणूनच बस सुरू आहेत तर लोकल का सुरू नाहीत, असे म्हणत अनेकांनी लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची मागणी केलेली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करू देण्याची मागणी आता केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोकल प्रवास मुभा मिळावी म्हणून ठाकरे सरकारकडे मागणी केली जात आहे. उच्च न्यायालयाने याच संदर्भात आता ठाकरे सरकारची कानउघडणी केली आहे. लोकल प्रवास मुभा देण्याबाबत लवकरात लवकर विचार करावा असेही उच्च न्यायालयाने सांगितले आहे. सरकार मात्र याबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने आता नागरिक संतप्त झाले आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊन काळात खासगी कंपनीतील नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला आहे. लोकलबंदीमुळे अनेकांना रस्तेमार्गाचा अवलंब करावा लागत आहे. तसेच अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. तर, आता ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांना कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने जागरूकता दाखवून लोकल सुरू करणं अपेक्षित आहे. अन्यथा खासगी नोकरदारांचे ईएमआय बंद करा आणि दरमहा १५ हजार रुपये भत्ता द्या, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने केली आहे.
मुंबई लोकल ही जीवनवाहिनी असल्यामुळेच उपनगरीय लोकलचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र, दीड वर्षापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल पूर्ण वेळ सुरूच झाली नाही. फेब्रुवारी २०२१ मध्ये फक्त ठराविक वेळेत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद केला. परिणामी नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जाता येत नाही. कामावर न गेल्याने हातात पगार येत नाही. या आर्थिक कोंडीमुळे नोकरदार वर्गाला उपासमारीची वेळ आली आहे. मुख्य म्हणजे मुंबईबाहेरील उपनगरांना मुंबईत कामाच्या निमित्ताने ये-जा करावी लागते. अशांसाठी लोकल हा एकमेव उत्तम परवडण्याजोगा पर्याय आहे.
हे ही वाचा:
…म्हणून तो फिरत होता सैनिकाच्या वेषात!
रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.
कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पराभव, कांस्य पदकासाठी उद्या सामना
तुम्ही रडू नका, देश तुमच्या पाठीशी आहे!
रस्तेमार्गाने वाहतूक करताना उपनगरातील नोकरदार वर्ग आता चांगलाच त्रस्त झालेला आहे. वाहतूक कोंडीमुळे दिवसातील किमान दोन ते चार तास केवळ प्रवासातच जात असल्याने उपनगरातील नागरिक लोकल प्रवास मुभा कधी मिळतेय याचीच वाट पाहात आहेत.