वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यानंतर लाड त्यांनी “मी केलेल्या भाषणाचा माध्यमांनी विपर्यास केला.” असंही ते म्हणाले. याच प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही, अशा इशारासुद्धा त्यांनी दिलाय.
मुंबईमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी बोलताना चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडीओ काढून स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही; पण अंगावर आलं तर सोडत नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट,नो पेट्रोल’
पूर्व आशियात कोरोनाची तिसरी लाट, भारतालाही धोका?
गणपती बाप्पा मोरया, ‘या’ गणपतीचं दर्शन घ्या
नरेंद्र मोदी करणार ‘हे’ ऐतिहासिक काम
भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत ३१ जुलै रोजी उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केलं. “दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत,” असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला. तसेच “शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू, तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू,” असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यानंतर वाद पेटल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं स्पष्ट केलं.