टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये थाळीफेक या खेळात भारतीय महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. पात्रता फेरीत अतिशय प्रभावी असे प्रदर्शन करून कमलप्रीत हिने भारतीयांच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. कमलप्रीत थाळीफेकमध्ये भारतासाठी पदक जिंकू शकली तर ॲथलेटिक्स प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली महिला ठरेल.
थाळी फेक या खेळातील राष्ट्रीय विक्रम जिच्या नावे आहे अशी कमलप्रीत कौर ही टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. शनिवार, ३१ जुलै रोजी रंगलेल्या थाळीफेक प्रकाराच्या पात्रता फेरित तिच्या प्रदर्शनाने सर्वांनाच प्रभावीत केले. पात्रता फेरीत ६४ मीटर इतक्या अंतरावर थाळी फेकून कमलप्रीतने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
पात्रता फेरीतील पहिल्या दोन संधीमध्ये कमलप्रीतने अनुक्रमे ६०.२९ मीटर आणि ६३.९७ मीटरवर थाळी फेकली. तर अखेरचा तिसऱ्या प्रयत्नात तिने ६४ मीटर इतकी लांब थाळी फेकली. थाळीफेक स्पर्धेच्या ग्रुप बी मध्ये कमलप्रीतने हा पराक्रम केला आहे. थाळीफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या महिला खेळाडूंपैकी, पात्रता फेरीत सर्वात दूरवर थाळी फेकणारी दुसऱ्या स्थानावरची महिला कमलप्रीत ठरली आहे.
हे ही वाचा:
आसाम, मिझोराम संघर्षाला ‘हे’ नवं वळण
बेन स्टोक्सचा क्रिकेटला अलविदा?
कमलप्रीतने अशाच प्रकारचे प्रदर्शन पुन्हा एकदा अंतिम फेरीत दाखवले तर तिचे पदक जिंकणे हे निश्चित मानले जात आहे. पण एकीकडे कमलप्रीत जरी अंतिम फेरीत पात्र ठरली असली तरी भारताची थाळीफेक मधील दुसरी खेळाडू सीमा पूनिया हिला मात्र अंतिम फेरीसाठी पात्र होता आले नाही. ग्रुप ए मध्ये खेळणारी सीमा ही सहाव्या स्थानावर राहिली आणि पात्र होऊ शकली नाही.