भारताची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाली आणि खळबळ उडाली. या ऑलिम्पिकमध्ये ती पदक जिंकणार अशी खात्री असताना तिला असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्याने चाहत्यांची प्रचंड निराशा झाली. पहिल्या फेरीत ती १-४ अशा मागे पडली तर बाकी दोन फेऱ्यांत ती ३-२ अशा फरकाने आघाडीवर होती. तरीही तिला पराभूत घोषित केले गेले याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. एवढेच नव्हे तर मेरी कोमलाही आपण पराभूत कसे झालो, याचे आश्चर्य वाटले. तिने स्वाभाविकच सामन्यानंतर नाराजी प्रकट केली.
पण यासंदर्भातील गुणदान पद्धती लक्षात घेतली तर मेरी कोम का पराभूत झाली हे स्पष्ट होईल.
ही गुणदान पद्धत २०१६च्या रिओ ऑलिम्पिकपासून अमलात आणली गेली. त्याआधी, खेळाडूच्या चेहऱ्यावर किंवा कमरेच्या वर समोरच्या बाजुला बसलेले ठोसे लक्षात घेऊन गुण दिले जात. पण २०१६पासून व्यावसायिक बॉक्सिंगप्रमाणे गुण देण्यास प्रारंभ झाला. त्यानुसार एका लढतीसाठी असलेले पाच जजेस वर्चस्व गाजविणाऱ्या खेळाडूला १० गुण देतात तर प्रतिस्पर्धी खेळाडूला ६ ते ९ गुण मिळतात. त्यावरून विजेता खेळाडू निश्चित होतो. त्यानुसार मेरी कोम (निळा) आणि व्हॅलेन्शिया व्हिक्टोरिया (लाल) यांच्यातील लढतीत झालेल्या तीन फेऱ्यांतून व्हॅलेन्शियाला विजयी घोषित करण्यात आले.
आता यातील प्रत्येक फेरीनुसार गुणदान पाहिले की आपल्याला यातला फरक लक्षात येईल.
पहिल्या फेरीत व्हॅलेन्शिया ४-१ अशी जिंकली. याचा अर्थ पाचपैकी चार जजेसनी तिला १० गुण दिले तर मेरी कोमला ९ गुण देण्यात आले. हे गुण देताना सामन्यात कोण वरचढ ठरले हे रेफ्रींनी ठरविले. यापैकी एका जजने मेरीला १० गुण दिले. त्यामुळे ४-१ अशा फरकाने व्हॅलेन्शिया जिंकली. हे ४ गुण नाहीत तर ४ जजेसनी व्हॅलेन्शियाच्या कामगिरीला दिलेली पोचपावती आहे.
दुसऱ्या फेरीत १०-९, १०-९ अशा फरकाने व्हॅलेन्शियाला दोन जजेसनी १० गुण दिले तर उरलेल्या तीन जजेसनी मेरीला अनुक्रमे १०-९, १०-९, १०-९ असे गुण दिले. स्वाभाविकच ती ही दुसरी फेरी ३-२ अशी जिंकली. यात ३ हा अंक तीन जजेस दाखवतो.
तिसऱ्या फेरीत पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीप्रमाणेच ३ जजेसनी मेरीला झुकते माप दिले तर इतर दोन जजेसना व्हॅलेन्शिया सर्वोत्तम वाटली. स्वाभाविकच तिथेही मेरी ३-२ अशी जिंकली.
यावरून सर्वसाधारणपणे कुणालाही वाटेल की, मेरी ही जिंकायला हवी. कारण पहिल्या फेरीत व्हॅलेन्शियाने ४-१ अशी बाजी मारली तर इतर दोन्ही फेऱ्यांत मेरी ३-२ अशी जिंकली. त्यामुळे दोन फेऱ्या मेरीने जिंकल्या म्हणजे ती विजयी ठरली. पण तिन्ही फेऱ्या झाल्यानंतर सर्व गुणांची बेरीज केली जाते. त्यानुसार विजयी खेळाडू घोषित होतो.
तिन्ही फेऱ्यांतील गुणांची बेरीज करताना आपल्याला दिसते की, तीन फेऱ्यात पहिल्या जजने व्हॅलेन्शियाला प्रत्येकी १० गुण दिले. ते झाले ३०. तर याच जजने मेरीला दिले प्रत्येकी ९ गुण म्हणजे झाले २७. अशा पद्धतीने व्हॅलेन्शिया ३० आणि मेरी २७ हा फरक पहिल्या जजच्या गुणसंख्येचा होता. दुसऱ्या जजचे एकूण गुण झाले व्हॅलेन्शिया वि. मेरीसाठी २९-२८. तिसऱ्या जजने दिलेले एकूण गुण होते २७-३०. म्हणजे व्हॅलेन्शियाला तीन फेऱ्यांतील मिळून २७ तर मेरीचे ३०. चौथ्या जजची गुणसंख्या होती २९-२८. म्हणजे व्हॅलेन्शियाला २९ तर मेरीला २८ आणि पाचव्या जजची एकूण गुणसंख्या झाली २८-२९. म्हणजे व्हॅलेन्शियाला २८ आणि मेरीला २९. आता ही तिन्ही फेऱ्यानंतर झालेली एकूण गुणसंख्या विचारात घेतली तर लक्षात येते की, व्हॅलेन्शियाने ३०-२७, २९-२८, २९-२८ अशा तीन जजकडून सर्वाधिक गुण मिळविले. तर मेरीला दोन जजचे ३०-२७, २९-२८ असे गुण मिळाले. स्वाभाविकच ३ विरुद्ध २ या फरकाने मेरीचा पराभव निश्चित झाला.
हे ही वाचा:
वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला
कारुळकर प्रतिष्ठानच्या समाजकार्याचे आकाशवाणीकडून कौतुक
अनिल देशमुख २ ऑगस्टला ईडीसमोर हजर होणार?
ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची
मेरी कोम ही भारताची आघाडीची खेळाडू असल्यामुळे आणि तिच्याकडून पदकाची अपेक्षा असल्यामुळे आपल्याला तिनेच बाजी मारावी असे वाटणे स्वाभाविकही आहे. शिवाय, मेरी कोमलाही नेमके हे गुण कसे दिले गेले आहेत, हे कळले नसल्यामुळे तिलाही आपणच दोन फेऱ्या जिंकल्यामुळे सामना जिंकल्याचा गैरसमज झाला असावा. गुणांचे हे बारकावे खेळाडूंना स्पष्ट करून सांगितले जातात का? सर्वसामान्यांना ही गुणदान पद्धत नीट माहीत असते का? जर तसे असेल तर मात्र असा गोंधळ होण्याची शक्यता असते आणि आपल्या खेळाडूवर अन्याय झाल्याची भावनाही निर्माण होऊ शकते.