मोक्काच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देतो, असे सांगून पॅरोलवर बाहेर आलेल्या एकाने आरोपीच्या पत्नीकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना विक्रोळी येथे उघडकीस आली आहे. वाचा सविस्तर…
विक्रोळी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सूरज कळव या भामट्याला बुधवारी अटक केली असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विक्रोळी पूर्व येथे राहणारा सुनील आंगणे (५८) याला गेल्यावर्षी गुन्हे शाखेने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सुनील आंगणे हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात आर्थर रोड तुरुंगात असणारा आरोपी सूरज कळव याची सुनील आंगणे सोबत तुरुंगात ओळख झाली होती. त्याने सुनील आंगणेला माझी वरपर्यंत ओळख असून तुला बाहेर पडल्यावर ताबडतोब जामिनावर बाहेर काढतो असे सांगितले. दरम्यान सूरज हा ४५ दिवसाच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. सुनील आंगणे याची पत्नी पतीला भेटण्यासाठी तुरुंगात गेली असता त्याने सूरज कळव याचे नाव सांगून तो मला जामिनावर बाहेर येण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगून तू त्याला संपर्क कर असे सांगितले.
हे ही वाचा:
प्रसिद्ध स्नॅक्स कंपनीच्या संचालकावर बलात्काराचा गुन्हा! कोण आहे तो?
‘तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री’…कोकणवासी कडाडले
खुशखबर!! ओबीसींसाठी इथे असतील २७ टक्के जागा…
गोंधळी खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करा
सुनील आंगणे यांच्या पत्नीने सूरज कळव याला संपर्क साधला व भेटण्यासाठी विक्रोळी येथे बोलावून घेतले. त्यावेळी त्याने वकीलांमार्फत सुनील जामीन मिळवून देतो असे सांगून ५ लाख रुपये खर्च येईल असे त्याने सांगितले. पतीला बाहेर काढण्यासाठी सुनील आंगणे यांच्या पत्नीने भावाकडून कर्ज घेऊन सूरज कळव याला दिले. त्यानंतर त्याने पुन्हा तुमच्या पतीची केस खूप स्ट्रॉंग आहे, त्यासाठी आणखी पैशाची गरज लागेल. न्यायाधीशाला ‘मॅनेज’ करण्यासाठी कमीतकमी २० लाख रुपये लागतील असे सांगितले. सुनील यांच्या पत्नी मंत्रालयात कामाला असल्यामुळे त्यांनी मंत्रालय बँकेतून तसेच इतर ठिकाणाहून त्याला २० लाख रुपये दिले. त्यानंतर सूरज कळव याने कधी सीबीआय अधिकारी, कधी घाटकोपर पोलीस ठाण्यातील तर कधी आझाद मैदान पोलीस ठाण्यातील अधिकारी बोलत असल्याचे सांगून तुमच्या पतीची आणि तुमची देखील चौकशी करायची असल्याचे सांगत या अधिकाऱ्याच्या नावाने वेगगवेगळी रक्कम अशी एकूण ९३ लाख १७ हजार रुपयाची रक्कम सुनील आंगणे यांच्या पत्नीकडून उकळली.
पतीला जामीन मिळत नसून आपली फसवणूक होत असल्याचे कळताच अखेर सुनील आंगणे याच्या पत्नीने सोमवारी विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. विक्रोळी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री सूरज कळव याला अटक केली असून त्याला स्थनिक न्यायालयाने ७ दिवसाची कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिली.