महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अफाट व्यक्तिमत्त्व बेलभंडारा या पुस्तकाच्या माध्यमातून शिवप्रेमींच्या सेवेत यापूर्वीच सादर झाले आहे, पण आता बाबासाहेबांचा तोच अद्भूत शिवमय प्रवास ऑडिओबुकच्या माध्यमातूनही उपलब्ध होणार आहे.
‘स्टोरीटेल मराठी’ने महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राचे डॉ. सागर देशपांडेलिखित ‘बेल भंडारा’ हे चरित्र रसिकश्रोत्यांच्या आवडत्या ‘ऑडिओबुक’मध्ये आणले आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य शब्दबद्ध करण्याचा डॉ. सागर देशपांडे यांचा हा प्रयत्न बाबासाहेबांच्या शतकमहोत्सवी वर्षात ऐकायला मिळणार आहे.
बाबासाहेब हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहेत. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व नेमकं घडलं कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात आहे. बाबासाहेबांनी स्वतःचं चरित्र लिहावं यासाठी त्यांना अनेकांनी अनेकदा विनवलं. त्यात अनेक दिग्गजांसह अगदी पु.ल. देशपांडेही होते. परंतु बाबासाहेबांनी हे कधी मनावर घेतलं नाही. ते फक्त आणि फक्त शिवमय होऊन राहिले. मात्र ‘बेल भंडारा’च्या निमित्ताने डॉ. सागर देशपांडे यांच्या ११ वर्षांच्या अथक परिश्रमानं आपल्यासाठी हा ‘भंडारा’ उपलब्ध झाला आहे.
‘बेल भंडारा’ ऐकताना श्रोत्यांच्या मनात असा विचार नक्की येतो की, एका व्यक्तीत एवढे गुण कसे काय असू शकतात? एवढी अशक्यप्राय वाटणारी कामं बाबासाहेब कसे काय यशस्वी करून दाखवतात? बाबासाहेब सर्वोत्तम वक्ता आहेत, लेखक आहेत, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानाट्याचे निर्माते आहेत व सर्वात मुख्य म्हणजे कुशल संघटक आहेत.
बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व, त्यांचा जीवनप्रवास मर्यादित शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडणं म्हणजे एकप्रकारे लेखकासमोर शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. ते डॉ. सागर देशपांडेंनी उत्तमरित्या पेललं आहे. याला नचिकेत देवस्थळी या अभिनेत्याचा आवाज लाभला आहे.
हे ही वाचा:
व्याघ्रदिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महत्वाचा संदेश! म्हणाले…
‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’
रंगकर्मीं का रागावले आहेत? जाणून घ्या कारणे…
जडणघडणचा विशेषांक
शिवाय, ‘जडणघडण’ या मासिकाचा विशेषांक शिवशाहीर बाबासाहेबांच्या १००व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारतरत्न लतादीदी, रावसाहेब शिंदे, स्वामी कार रणजित देसाई, माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार आदि मान्यवरांचे बाबासाहेबांवरील लेख त्यात आहेत.