मृग अर्थात हरिण या प्राण्याचा उल्लेख अनेकदा सौंदर्याच्या दृष्टीने झालेला दिसतो. असे काही दाखले आपल्याला पुराणात पाहायला मिळतात. रामायणात सीता मैय्या ह्यांना एका सुवर्ण मृगाची भुरळ पडल्याची नोंद आहे. तर अनेक कविता, गाण्यांमध्ये हरणाच्या अवयवांची उपमा देऊन सौंदर्याचे वर्णन केलेले आपण ऐकले असेल. पण एक हरिण माणसाला एवढे मोहात पडू शकत असेल तर तीन हजार हरणांचा कळप बघणे हे कोणत्याही मानवासाठी किती मोहक दृश्य असेल?
याचीच प्रचिती सध्या सोशल मीडियावर येत आहे. सोशल मीडियावर सध्या हरणांच्या एका कळपाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हरणांचा एक कळप धावत, उड्या मारत रस्ता ओलांडताना दिसत आहे. ह्या कळपात थोडी थोडकी नाही तर तब्बल तीन हजार हरणं असल्याचे सांगितले जात आहे. हरणांच्या या व्हिडीओने सध्या देशभरातील नेटकाऱ्यांना भुरळ पाडली आहे.
हे ही वाचा:
येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे
‘शिवसेनेकडूनच शिवाजी महाराजांचे नाव देण्यास टाळाटाळ’
भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट
…आणि बैल आंदोलनजीवींवर वैतागला!
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर येत आहे. भावनगर जिल्ह्यात गुजरातमधील प्रसिद्ध असे वेलावदार राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान हरिण, काळवीट अशा विविध प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. १९७६ साली जुलै महिन्यातच या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. या राष्ट्रीय उद्यानात जंगली मांजर, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, तरस, जंगली कुत्रा, विविध प्रजातीचे पक्षी आढळून येतात.
कोरोनाच्या काळात सगळेच ठप्प झालेले असताना प्राणी आणि पक्ष्यांना एक मोकळीक मिळाली आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही प्राणी पक्ष्यांचा वावर वाढला आहे. त्यातच या प्राणिमात्रांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे दर्शन आता मानवाला होऊ लागले आहे.