24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयआपत्तीची दरड....

आपत्तीची दरड….

Google News Follow

Related

पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपत्तीची दरड कोसळली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरण्याची लक्षणे कुठे दिसू लागली तर पुराने राज्याच्या अनेक भागात थैमान घातले आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. कोल्हापूर सांगलीवर पुराचे सावट आहे. रायगड जिल्ह्याला सर्वाधिक झळ बसली असून एकट्या तळीये गावात ३८ पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. रायगडमध्ये मृत्यूचा एकूण आकडा ४९ आहे. हा आकडा वाढतो आहे. चिपळूणमध्ये कोविड सेंटरमध्ये पाणी जाऊन ८ रुग्णांचे बळी गेले. राज्यात दरड कोसळून ६६ पेक्षा जास्त बळी गेले आहेत. सिंधूदुर्ग जिल्ह्यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे तांडव शहारा आणणारे आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली कोकणातील छायाचित्रे थरकाप उडवणारी आहेत. महाडमधील दरड कोसळलेल्या तळीये गावात ढीगाऱ्यातून एका लहान बालकाचे शव बाहेर काढतानाचा व्हीडिओ काळजाला चटका लावणारा आहे. कदाचित त्या बाळावर रडण्यासाठी त्याचे पालकही या जगात हयात नसतील. चिपळूण बस स्टँडवर पाण्याखाली गेलेल्या एसटीची छायाचित्रे पुराचे गांभीर्य सांगणारी आहेत. एसटी आगारातील कर्मचारी आणि व्यवस्थापकांनाही एसटीसोबत जलसमाधी मिळाली असती. परंतु ९ तास एसटीच्या टपावर बसून त्यांनी कसेबसे जीव वाचवले.

हे ही वाचा:

मालाडमधील त्या रहिवाशांचे पुनर्वसन होणार तरी केव्हा?

भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

मीराबाई चानूने रौप्य पदक उचलले

एरोटीका म्हणजे पॉर्न नाही…माझे पती निर्दोष

खेड, चिपळूणमध्ये घराघरांत पाणी शिरले आहे, शिवारात पाणी, दुकानात पाणी अशी अवस्था आहे. अनेक ठिकाणी तळमजल्याच्या छतापर्यंत पाणी गेल्यामुळे लोकांनी कुटुंबाना पहिल्या मजल्यावर हलवले. जिथे पहीला मजलाच नाही अशा लोकांची काय अवस्था झाली असेल हे कळायला मार्ग नाही. किती लोक दगावले याचा नेमका आकडा आता हाती आलेला नाही. तूर्तास बळींची संख्या शंभरावर गेली आहे. २००५ नंतर कोकणात आलेल्या पूरपरीस्थिती पेक्षाही हे भयंकर आहे.
अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते वाहून गेलेत. काही ठिकाणी रस्त्यांवर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत.

लोकांच्या नुकसानीचा अंदाज बांधता येणार नाही अशी परिस्थिती आहे. बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. छोटीमोठी हॉटेल्स, किराणा, भांडी, स्टेशनरी, कपड्यांच्या दुकानांत पाणी गेल्यामुळे लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना काळात सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेला व्यापारी पुराच्या संकटामुळे पार उद्ध्वस्त झाला आहे.
१८ आणि १९ जुलैला मुंबईत कोसळलेल्या पावसापासून राज्यात दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. मुंबईत पूरपरिस्थिती होती. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कमरे इतके पाणी शिरले. अनेक ठिकाणी लोकांच्या पोटमाळ्यापर्यंत पाणी गेल्यामुळे घरातले फ्रीज, टीव्ही, कपाटं, कपडे, पुस्तकं सगळ्याची बर्बादी झाली. एकट्या कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर वस्तीत १० हजार घरांत पाणी शिरले, दामू नगर आप्पा पाडा, बीडीडी चाळ, कुर्ला अशी मोठी यादी आहे. गोवंडीत दोन मजली घर कोसळून चौघांचा मृत्यू झाला, १५ जण जखमी झाले.

राज्यावर आलेले संकट एवढे मोठे आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही घराचा उंबरा ओलांडून वर्षभराने मंत्रालयात जावेसे वाटले. ‘अतिवृष्टीला काही मर्यादा राहीलेली नाही, संकट अनपेक्षित आहे, ढगफुटीचा अंदाज कोणी करू शकत नाही, दरडी कोसळण्याचा अंदाजही कोणी करू शकत नाही’, असे मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणतायत ते खरं आहे, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, अशा नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा माणसाचे कर्तृत्व खुजे वाटू लागते. अशावेळी फाटलेलं आभाळ सांधण्यासाठी अलौकीक श्रम घ्यावे लागतात. पराक्रमाची शर्थ करावी लागते. परंतु ठाकरे सरकारकडून असे प्रयत्न दिसले नसल्याचे खेदाने म्हणावे लागेल.

हे ही वाचा:

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

मीराबाईने साऱ्या जगाला दाखवून दिले भारतीय संस्कार

ठाकरे सरकारच्या या चुकीला माफी नाही!

संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!

मदत करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु ती मदत घेतानाही दिरंगाई झाली. पुराचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने नौदल, लष्कर आणि तटरक्षक दलाला मदतीसाठी बोलावण्याची गरज होती. घटनेतील तरतुदीनुसार राज्य सरकारच्या लिखित मागणीशिवाय लष्कर मदतीला येत नाही. ‘नौदलाशी संपर्क केला असता राज्य सरकारने अद्यापि मदत मागितली नसल्याचे सांगण्यात आले’ असे वृत्त आज महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. ही दिरंगाई अक्षम्य आहे. हा वेळकाढूपणा लोकांच्या जीवावर बेतला आहे. महाराष्ट्राच्या किंकाळ्या मातोश्रीपर्यंत पोहोचतच नाहीत, अशी खंत जनता व्यक्त करते आहे. मंत्रिमंडळाची अवस्था वेगळी नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जारी केलेल्या एका व्हीडिओमध्ये पुराच्या सावटाखाली असलेल्या पश्चिम महाराष्ट्राबाबत चर्चा केली आहे. ते पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री नसून राज्याचे आहेत याचा त्यांना बहुधा विसर पडला असावा. पुराने हवालदिल झालेल्या कोकणवासिसांच्या जखमांवर हा व्हीडिओ मीठ चोळून गेला.

शनिवारी दुपारी मुख्यमंत्री महाडला रवाना झाले, १२ वाजता रवाना होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर १२.४० ला उडाले. ते महाडला भेट देऊन ३.२० पर्यंत तिथून निघणार आहेत, असे त्यांच्या जनसंपर्क कक्षाने म्हटले आहे. राज्य कडेलोटाच्या सीमेवर उभे आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचे असे भोज्या करून परतणारे दौरे काय साध्य करणार आहेत?

प्रशासनाला गंज चढलाय. कठीण प्रसंगी सुद्धा व्यवस्थेवर जमलेली धूळ झटकून तडफेने काम करण्याची इच्छाशक्ती प्रशासनाने गमावली आहे. चिपळूण ते तळीयेपर्यंत लोक एकमेकांची मदत करत होते. एकमेकांचे अश्रू पुसत होते.

प्रसंग मोठा बाका आहे. काही ठिकाणी पाणी ओसरत असले तरी लोकांना तातडीच्या मदतीची गरज आहे. पिण्याचे पाणी, अन्न, कपडे, अंथरूण, औषधांची गरज आहे. कुणाच्याही तोंडाकडे न पाहाता आता जनतेसाठी जनतेने कंबर कसण्याची गरज आहे. पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी लाखो हातांनी पुढे येण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा