यंदाचे १२ वीचे वर्ष हे खरंतर खूप खडतर होते, कोरोना कार्यकाळात ऐनवेळी न घेण्यात आलेली परीक्षा आणि बरंच काही. परंतु या खडतर काळातही शिक्षकांनी मात्र स्वतःची जबाबदारी कुठेही टाळली नाही. असे असले तरीही आता बारावीचा निकाल रखडण्याची चिन्हे आहेत. अंतर्गत मूल्यमापन गुणांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे आता निकाल रखडणार हे स्पष्ट झाले आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शिक्षकही वैतागले आहेत. परिणामी शिक्षकांना तासन् तास थांबावे लागत आहे. राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संगणकीय प्रणालीमध्ये गुण भरले जातात. परंतु अनेकदा वीजपुरवठा गेल्याने या कामासाठी खूपच वेळ लागत आहे. तसेच इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे शिक्षकांना केवळ वाट पाहावी लागत आहे.
हे ही वाचा:
लोकल सुरू करा! भाजपाचे सविनय नियमभंग आंदोलन
ऑलीम्पिकला दिमाखात सुरुवात; भारतीय पथकाने केले संचलन
चिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू
डोंगरउतारावरील झोपड्यांवर सर्वाधिक धोक्याचे सावट
ठाकरे सरकारने ऐनवेळी शिक्षकांना मूल्यांकनाच्या कामाला लावूनही शिक्षकांनी स्वतःला झोकून देऊन निकालाच्या प्रक्रीयेस सुरुवात केली. यंदा १२ वी करता जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य मूल्यमापन प्रक्रीयेंतर्गत पणाला लागले आहे. दहावीचा निकालही १७ दिवसांत लावण्याचा विश्वविक्रम एसएससी बोर्डाने केला. ३०:३०:४० चे सूत्र बारावीच्या निकालाकरता याआधीच जाहीर झाले आहे. यामध्ये दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांचा अंतर्भाव असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार १२वी निकाल हा ३१ जुलैपर्यंत जाहीर करावा लागणार आहे. परंतु मूल्यमापन गुण भरताना येणारी अडचण फारच मोठी आहे. त्यामुळे शिक्षकांची आता चांगलीच तारांबळ उडालेली आहे. म्हणूनच बारावीचा निकालासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी आता शिक्षकांकडून होत आहे.