गेल्या २४ तासांपासून बदलापूर शहर आणि परिसरात आलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर या संपूर्ण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही तासांत बदलापूरमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे रमेशवाडी, हेंद्रेपाडा, बॅरेज रोड या परिसरात तब्बल तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. या पुराचा फटका बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी असलेल्या पेट्रोल पंपाला देखील बसला. या पेट्रोल पंपावर तब्बल तीन ते चार फूट पाणी साचलं होतं.
तर या भागातल्या घरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. तर बदलापूर शहराकडून बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेल्यामुळे बदलापूर शहराचा अनेक गावाशी अनेक तास संपर्क तुटला आहे. बदलापूर शहरात आज सकाळी आलेल्या पुरामुळे बाजारपेठेत पाणी घुसून मोठं नुकसान झालं. या भागातल्या दुकानांमध्ये जवळपास दोन ते तीन फूट पाणी शिरलं होतं. याचा फटका एका खताच्या दुकानाला बसला.
हे ही वाचा:
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील कर्ज भाजपाने फेडले
परमबीर सिंग यांच्यासह ८ वरिष्ठ पोलिसांवर गुन्हा दाखल
चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार
चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित
बदलापूरच्या रमेशवाडी परिसरात आज सकाळी उल्हास नदीचं पाणी घुसलं. त्यामुळे या भागातल्या दुकानांमध्ये सुद्धा जवळपास दोन ते तीन फूट पाणी शिरलं होतं. या पाण्याचा एका खताच्या दुकानाला मोठा फटका बसला. पावसाळा सुरू झाल्यावर शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. यासाठी खतांना सुद्धा मोठी मागणी असते. बदलापूरच्या रमेशवाडी परिसरातील उल्हास नदीच्या बाजूला असलेल्या एका खतांच्या दुकानात पुराचं पाणी शिरलं. यामुळे दुकानातली जवळपास एक ट्रक भरुन युरिया खताची पोती ओली झाली. त्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकाचं मोठं नुकसान झालं.