राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात गेल्या ४ दिवसांपासून पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. पावसानं धारण केलेल्या या रुपानं कोकणातली शहरं पाण्यात बुडाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.
हे ही वाचा:
चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित
चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू
आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही
मालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदीरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.