दीपक चाहरच्या नाबाद अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंका विरोधातील दुसरा एक दिवसीय सामना जिंकून मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेने जवळपास घशात घातलेला सामना भारताने ३ गाडी राखत खेचून आणला आहे. तर या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाची सुरुवात चांगली झाली. श्रीलंकेचे सलामीवीर आविष्का फर्नांडो आणि भानुका या दोघांनी ७७ धावांची भागीदारी रचत पाय भक्कम केला. फर्नांडोने तर अर्धशतक झळकावले. पुढे मधल्या फळीतील असालंका याने ६६ धावांची खेळी करून मोलाचे योगदान दिले. तर करुणारत्ने याने नाबाद ४४ धावांची खेळी करत श्रीलंका संघाला २७५ धावांची मजल मारायला मदत केली.
हे ही वाचा:
कोविड काळात हाय वे बांधणी सुसाट
भारताच्या ‘सारंग’ ची होणार रशियात हवा
पालिकेत हा कुठल्या ‘पेंग्विन गँग’चा भ्रष्टाचार सुरू आहे?
ठाण्यातील ‘छम छम’ मुळे दोन पोलिसांचे निलंबन, तर दोघांची बदली
२७६ धावांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताचे सलामीवीर शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि ईशान किशन हे स्वस्तात बाद झाले. पण पुढे मधल्या फळीतील मनीष पांडे (३७), सुर्यकुमार यादव (५३) आणि कृणाल पांड्या (३५) यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमारने अर्धशतकी खेळी केली. पण तरीही भारतीय संघ विजयापासून दूर होता.
अशातच दीपक चाहर खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यावेळी भारतीय संघाची स्थिती ६ बाद १६० अशी होती आणि विजयासाठी ११६ धावा आवश्यक होत्या. दीपक चाहरने अतिशय संयमी खेळाचे प्रदर्शन करत ८२ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी साकारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तर त्याला उपकर्णधार भुवनेश्वर कुमार याने २८ चेंडूत १९ धावा करत चांगली साथ दिली.