‘प्यू रिसर्च सेंटर’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधन संस्थेने ‘भारतातील धर्म: सहिष्णुता आणि विलगता’ नावाचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. एकूण २३३ पानांच्या या अहवालातून भारतातील नागरिकांच्या धर्म विषयक विचार आणि धारणांच्या संदर्भाने अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. पण या अहवालाने भारतातील पुरोगाम्यांच्या असहिष्णुतेच्या दाव्याला सुरुंग लावण्याचे काम केले आहे. भारतातील अल्पसंख्यांक या देशात स्वतःला असुरक्षित समजत नाहीत हे या सर्वे मधून स्पष्ट झाले आहे. तर इथले सर्वच धर्म हे इतर धर्मांचा आणि त्यांचे आचरण करणाऱ्या नागरिकांचा आदर करतात हे देखील अधोरेखित झाले आहे.
२०१४ साली नरेंद्र मोदी हे या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि २०१५ पासूनच हा देश असहिष्णू झाल्याची ओरड सुरू झाली. दादरी येथील अखलाक हत्या प्रकरण हे याला निमित्त ठरले. तसे तर २००२ पासूनच नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मुस्लिम विरोधी बनवण्याचा घाट या देशातील स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळींनी घातला होता. हा साराच आक्रोश कायम स्वतःच्या सोयीने केलेला होता. पण त्यात त्यांना सातत्याने अपयश येते गेले. पण तरीही त्यांचा कंडू न शमल्याने त्यांच्या सततच्या कुरापती सुरूच असतात.
२०१५ साली ऐकू आलेली असहिष्णुतेची बांग हा त्याचाच एक भाग होती. त्यानंतर ती सातत्याने या ना त्या कारणाने देशात ऐकू येऊ लागली. अनेक पत्रकार, कलाकार, चळवळीतले वळवळे कार्यकर्ते हे सारेच त्यात अग्रणी होते. पण त्यांच्या या भूलथापांना देशाची जनता बळी पडली नाही. २०१९ साली पंतप्रधान मोदी हे आधीपेक्षा जास्त घवघवीत यश मिळवत निवडून आले.
मोदींच्या या विजयातून भारतीय नागरिकांनी पुरोगाम्यांना सणसणीत चपराक तर लागवलीच, पण बहुदा यातूनच बहुदा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ सारख्या संस्थांच्या मनात हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असावे की भारतीय पुरोगाम्यांच्या असहिष्णुतेच्या किंवा अल्पसंख्यांक घाबरून राहत असल्याच्या दाव्यांत कितपत तथ्य आहे? यातूनच ‘प्यू’ ला भारतातील धर्म या विषयावर एक सर्वेक्षण करावेसे वाटले असावे. ज्याच्या निकालातून पुरोगामी दाव्यांचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे.
हे ही वाचा:
मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्षच भाजपाच्या वाटेवर?
घराघरात कंबरभर पाणी आणि बुडाले संसार
कुंद्रा व सहकाऱ्याला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे
‘प्यू रिसर्च सेंटर’ च्या अहवालाची वैशिष्ट्ये
१७ नोव्हेंबर २०१९ ते २३ मार्च २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत हा सर्वे करण्यात आला. या सर्वेमध्ये एकूण २९ हजार ९९९ लोकांनी प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. तर देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण २९ ठिकाणी हा सर्वे केला गेला. त्यामुळे या सर्वेमध्ये भौगोलिक समतोल साधायचाही प्रयत्न संशोधन संस्थेने चांगल्या प्रकारे केला गेला आहे. जर आपण या सर्वेचा कालावधी बघितला, तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० हटवणे आणि नागरिकत्व सुधारणा कायदा असे दोन मोठे निर्णय घेऊन झाले होते. ज्या निर्णयांना अल्पसंख्यांक आणि प्रामुख्याने मुस्लिम विरोधी असल्याचे भासवण्यात आले होते. पण तसे असूनही या सर्व्हेतून समोर आलेले निष्कर्ष काहीतरी वेगळेच सांगतात. गेल्या महिन्यात म्हणजेच २९ जून २०२१ रोजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
काय सांगतो ‘प्यू रिसर्च सेंटर’ चा अहवाल?
‘प्यू रिसर्च सेंटर’ च्या अहवालानुसार भारतातील ९१ टक्के जनतेला असे वाटते की भारतात त्यांना स्वधर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध या चार मोठ्या धर्मांचा विचार केला, तर दहा पैकी नऊ जण असे सांगतात की भारतात त्यांना धर्माचरणाचे स्वातंत्र्य आहे. जैन पंथाच्या नागरिकांमध्ये हे प्रमाण ८५ टक्के आहे आणि शिखांमध्ये ८२ टक्के. तर दुसर्या बाजूला भारतातील ७९ टक्के लोकांना असे वाटते की आपला धर्म सोडून इतर धर्मियांनाही त्यांच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे.
धर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाच्या संदर्भात विचारले असता भारतातील ८३ टक्के जनता असं सांगते की त्यांना कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भेदभावाचा प्रत्यय आलेला नाही. मुसलमान समाजातील तर ७९ टक्के लोक असे सांगतात की त्यांना कोणत्याही पद्धतीच्या धार्मिक भेदभावाचा सामना करावा लागला नाही. ‘प्यू रिसर्च सेंटर’ च्या दाव्यानुसार पाच पैकी चार मुसलमानांना भेदभावाचा अनुभव येत नाही. तर ख्रिश्चन धर्मियांचा विचार केला तर ९० टक्के ख्रिश्चन भेदभावाचा प्रत्यय न आल्याचे सांगतात. यावरून भारतात अल्पसंख्यांक आणि त्यातूनही भारतात उगम न पावलेल्या धर्मांचे नागरिक सुरक्षित नाहीत या दाव्यातील पुरी हवाच निघून जाते.
आजपर्यंत ‘असहिष्णुता’, ‘अल्पसंख्यांक धोक्यात’ अश्या अनेक कपोलकल्पित दाव्यांनी या देशाची बदनामी करण्याचे असंख्य प्रयत्न झाले. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर झाले. सध्याच्या कोविड कालखंडातही याचा प्रत्यय आला. पण या भारतविरोधी कारस्थानांमुळे ना कधी या देशाच्या एकतेला कोणी धक्का लावू शकले ना संस्कृतीला! भारत ही जगातील सर्वात मोठी सहिष्णू संस्कृती आहे आणि त्याला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. पण ‘प्यू रिसर्च सेंटर’ सारख्या संस्थांच्या अहवालांमधून तशी पोचपावती मिळत असेल तर त्याचे स्वागतच आहे.