चौघांचा शोध सुरू; अंबरनाथमध्ये तीन जनावरेही गेली वाहून
ठाणे शहरी भागासह जिल्ह्यात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली असून सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ४६२.०९ मिमी पाऊस झाला आहे. याचदरम्यान शहरी भागासह ग्रामीण भागात पाण्यात पडून किंवा उडी मारल्याने पाच जण वाहून गेल्याची बाब पुढे आली असून त्यामध्ये एका ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तर चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अंबरनाथ येथे एका बंधाऱ्यात एकाच शेतकऱ्याची तीन जनावरे वाहून गेली आहेत.
सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात ४६२.०९ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक १२५.०४ मिमी पाऊस कल्याण तालुक्यात झाला, त्या पाठोपाठ ठाण्यात ९८.९२, अंबरनाथ ८७.६२,भिवंडी ७९.२५, शहापूर ३८.०१ आणि मुरबाड ३४.०६ अशी पावसाची नोंद झाली आहे. तसेच शनिवारी रात्रीपासून पावसाचा कहर सुरूच आहे.
हे ही वाचा:
केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही
दशावतारी कलाकारांचे दुर्दैवाचे दशावतार थांबवा!
या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही
बापरे! कळव्यात दरड कोसळली; एकाच घरातील पाच जण दगावले
याचदरम्यान जिल्हा प्रशासनाचा पावसामधील नैसर्गिक आपत्ती घटनांबाबतच्या प्राथमिक अहवालात पाच जण पाण्यात पडू किंवा उडी घेतल्याने वाहून गेले आहेत. यामध्ये उल्हासनगर तालुक्यातील शांतीनगर,गाऊबाई पाडा येथील रहिवासी असलेला चार वर्षीय रुद्र बबलू गुप्ता हा तेथील नाल्यात पडून त्याचा मृत्यू झाला आहे. तर शहापूर तालुक्यात सवरोली येथे फिरण्यासाठी आलेले सूर्या राजपूत हे मानस सरोवर भिवंडी या नदीत पडून वाहून गेले आहेत. तसेच भिवंडी चावींद्र नदीत जुबदे अन्सारी (१९) वाहून गेला आहे.
याशिवाय ठाण्यात उथळसर नाल्यात उडी मारल्याने जीवन ओहाळ (३०) हा तरुण वाहून गेला आहे. तर कल्याण तालुक्यात डोंबिवली गणेश विसर्जन घाट येथे एका इसमाने खाडीत उडी घेतली आहे. अशा चौघांचा शोध स्थानिकांबरोबर संबंधित यंत्रणा करत आहे. याचबरोबर नामदेव म्हात्रे यांच्या दोन म्हशी आणि एक पारडे अशी तीन जनावरे अंबरनाथ येथील चिंचवली बंधाऱ्यात वाहून गेले असल्याची माहिती अहवाल नमूद करण्यात आली आहे.