लखनौ विद्यापीठात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांकडे भारतीय नजरेतून पाहण्यासाठी उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या विविध विचारवंतांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, मानवेंद्र नाथ रॉय, राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरणसिंह यांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
राज्यशास्त्राच्या विषयामध्ये प्रथमच दोन उजव्या विचारधारेच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक दीन दयाळ उपाध्याय यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्येच दोन भारतीय तत्त्वज्ञांच्या विचारांचा समावेश करण्यात आला आहे. यात स्वामी विवेकानंद आणि मानवेंद्र नाथ रॉय यांचा समावेश करण्यात आला आहे. आजवर यांच्या कामाचा समावेश थेट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात करण्यात आला होता.
हे ही वाचा:
…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत
भरदिवसा वकिलावर तलवारीने वार; दहिसरमध्ये कायदा सुवस्थेचे तीन तेरा!
आरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही
त्याबरोबच प्रथमच अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये देखील चौधरी चरणसिंह, राम मनोहर लोहिया आणि दीन दयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांसोबतच महात्मा गांधी यांचे विचार देखील शिकवले जाणार आहेत. यामध्ये गांधींच्या स्वयंपूर्ण खेडी, विश्वस्ताचा विचार, साध्या राहणीवर आधारित आर्थिक विचार, सत्तेचे विकेंद्रीकरण, सहकार, समानता, अहिंसा इत्यादी विचारांचा समावेश आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी या नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा बदल लखनौ विद्यापीठाच्या ॲकॅडमिक काऊंसिल कडून मान्यता मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा आणि देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये या साहित्याच्या अभ्यासाची दालने खुली करावीत अशी मागणी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केंद्र सरकारकडे केली होती.