बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार झाल्याने अतिवृष्टी
येत्या २४ ते ३६ तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आधीच मुंबईत अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधांची दाणादाण उडाल्याची स्थिती आहे. त्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. वसई-विरार आणि पालघरमध्ये देखील सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावासाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून पावसानं अजिबात उसंत घेतली नाहीये. त्यात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि खड्डे यामळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. दरम्यान हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत अनेक भागात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ३ ते ४ तास मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो.
तसेच आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात साधारण २०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद ही येत्या २४ तासात ह्या तिन्ही जिल्ह्यात बघायला मिळू शकते. मुंबई, ठाणे आणि पालघरचा विचार केला तर साधारण १९ ते २२ जुलै दरम्यान ह्या तिन्ही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असेल. ज्यात ह्या चार दिवसांच्या दरम्यान आपल्याला १०० मिमी ते २०० मिमीपर्यंतचा पाऊस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बघायला मिळू शकतो.
हे ही वाचा:
उघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता
ठाण्यात भिंत कोसळून दहा गाड्यांचे नुकसान
महापालिकेच्या पार्किंगमध्ये ४०० गाड्यांना जलसमाधी
महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो
रायगड परिसरात देखील पुढील ३ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील अनेक भागात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. अशातच पुढील ३-४ तास मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी डोंगर खचल्याच्याही घटना बघायला मिळाल्या आहेत.