विरार शहरात लसटंचाई असल्याचे कारण देऊन पालिकेने लसीकरण केंद्र बंद ठेवलेली आहेत. पालिकेने ५१ पैकी ४६ लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी जायचे कुठे असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. यापुढे पालिकेची केवळ ५ लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे या केंद्रावर सामान्यांची तोबा गर्दी होणार यात शंका नाही. असे असले तरीही, खासगी लसीकरण मात्र शहरामध्ये वेगाने सुरु आहे. पालिकेकडून तब्बल २९ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना लस विकत घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
राज्यामध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आता या मोहीमेला तब्बल सहा महिने उलटले आहेत. असे असले तरीही राज्यामध्ये लसीकरणाचा वेग हा मंदावलेलाच आहे. गेल्या काही दिवसांपासून विरार शहरात लसटंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. तसेच स्थानिक प्रतिनिधींनी आपापल्या भागात लसीकरण केंद्रे सुरू केली. त्यामुळे वशिलेबाजी वाढली, त्याचा त्रास सामान्य जनतेला होत आहे.
हे ही वाचा:
पालिका प्रशासनाचे दावे बुडाले पाण्यात
२०२२ पर्यंत देशाच्या सर्व सीमांवर कुंपण पूर्ण होणार
मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?
सचिन वाझेने केला जामिनासाठी अर्ज
पालिकेची लसकेंद्रे बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता लस घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पालिकेची लसीकरण केंद्रे बंद केली असली तरी, नागरिकांना लस मिळावी याकरता खासगी रुग्णालयांना परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली सिंग यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राशी बोलताना दिलेली आहे. वसई-विरार शहरातील लोकसंख्या २२ लाख गृहीत धरून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र १५ जुलैपर्यंत केवळ १२.८ टक्के लसीकरण झालेले आहे. त्यात लशींची पहिली मात्रा १०.१ टक्के जणांना, तर दुसरी मात्रा केवळ २.७ टक्के जणांना देण्यात आली आहे.