रविवार, ११ जुलै रोजी रंगलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विजय संपादन केला आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या ब्राझीलचा १-० असा परभाव करत अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. पण हे यश अर्जेंटिना संघापेक्षा जास्त त्यांचा कर्णधार लियोनेल मेस्सी याचे मानले जात आहे. कारण मेस्सीच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तो आंतरराष्ट्रीय ख्यातीची फुटबॉल स्पर्धा जिंकला आहे.
रविवारी पहाटे ५.३० वाजता अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यात कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. संपूर्ण सामन्यामध्ये ब्राझीलचा संघ हा आक्रमक राहिला. सुरुवातीपासूनच तसे संकेत दिसत होते. पण सामन्याच्या २२ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचे सोने करत अर्जेंटिनाने गोल करत आघाडी घेतली. अर्जेंटिनाच्या मधल्या फळीतील खेळाडू एंजेल डी मारिया याने हा गोल नोंदवला. ब्राझीलच्या बचाव फळीला भेदणाऱ्या एका अप्रतिम पासवर चीप शॉट मारत डी मारियाने गोल केला. सामन्याचा हा एकमेव गोल ठरला. तर याच गोलच्या जोरावर अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका चषकावर आपले नाव कोरले आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय
नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू
ओबीसी इम्पिरिकल डेटाचे सर्वेक्षण करणार ‘कलेक्टर’; मग केंद्र काय करणार?
बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार
डी मारियाच्या गोल नंतर अर्जेंटिना संघाचा खेळ हा बचावात्मक दिसून आला. तर ब्राझील संघ शक्य तेवढा आक्रमक खेळ करून सामन्यात बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील दिसला. पण अर्जेंटिनाच्या बचाव फळीला आणि त्यांचा गोलकीपर मार्टिनेझ याला चकवत गोल करणे ब्राझीलला शक्य झाले नाही. अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेझ हा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलकीपर ठरला आहे. त्यासाठी त्याला पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले आहे. तर अंतिम सामन्यातील एकमेव निर्णायक गोल करणाऱ्या एंजेल डी मारिया याला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सी हा या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. तर त्यासोबतच मेस्सीला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही सन्मानित केले गेले आहे. कोपा अमेरिका स्पर्धेचे हे विजेतेपद हे मेस्सीसाठी खूपच विशेष मानले जात आहे. कारण मेस्सीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण केल्यापासून पहिल्यांदाच अर्जेंटिना संघाने एखादी आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा जिंकली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असणाऱ्या मेस्सीने क्लब फुटबॉलमध्ये अनेक विक्रम नोंदवले. अनेक पुरस्कार पटकावले. अनेक स्पर्धा जिंकल्या. पण आपल्या देशासाठी तशी कामगिरी तो करत नाही अशी टीका त्याच्यावर कायम होत आली आहे. पण या विजयातून सर्व टीकाकारांना मेस्सीने जोरदार चपराक लगावली आहे.