ठाकरे सरकारच्या काळात शिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोबा झालेला आहे. प्रत्येक शिक्षणाच्या विभागात ठाकरे सरकारने घातलेला घोळ हा डोकेदुखी ठरलेला आहे. आता तब्बल दीड महिना होऊन मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा अद्याप निकालही लागलेला नाही. त्यामुळे आत पदवीनंतर पुढे काय करायचे यावर अनेक विद्यार्थी चिंतेत आहेत.
मे महिन्याच्या २० तारखेला सर्व शाखांच्या पदवी परीक्षा झालेल्या आहेत. परंतु अजूनही निकालाबाबत कुठलीच वार्ता कानी पडत नाही. परीक्षा संपून दोन महिने होत आले, तरी निकाल जाहीर करण्याचे नाव नाही. मुख्य म्हणजे राज्यातील इतर विद्यापीठांचे पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अनेकदा पदवीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यावे याकरता पदवीच्या गुणांची आवश्यकता असते. त्याला अनुसरून विद्यार्थी नियोजन करत असतात. परंतु निकालच जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी व्दिधा मनःस्थितीत आहेत.
महाविद्यालयांकडे अनेक विद्यार्थी आता निकालाविषयी चौकशी करत आहेत. महाविद्यालयांनी उत्तरपत्रिका तपासून विद्यापीठाला पाठविल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता विद्यापीठ कधी निकाल जाहीर करणार याकडे विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत. विद्यापीठाला मात्र वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निकालाचे काम विद्यापीठाकडून धीम्या गतीने सुरु आहे.
हे ही वाचा:
अन्नपूर्णा मठ मंदिराचे महंत रामेश्वर पुरी यांचे निधन
नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू
ठाण्यातील रस्ता सात-आठ फूट खचला
ओबीसी इम्पिरिकल डेटाचे सर्वेक्षण करणार ‘कलेक्टर’; मग केंद्र काय करणार?
अपुरे मनुष्बळ असल्यामुळे निकाल लावण्याच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.तसेच मुख्य म्हणजे लोकलप्रवास मुभा नसल्यामुळे कर्मचारी विद्यापीठापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा अनेक अडचणींमध्ये विद्यापीठ वेढले आहे. शिवाय कोरोनाच्या नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीचा नियम विद्यापीठात लागू आहे. यामुळे निम्मे कर्मचारी विभागात काम करत आहेत. त्यातच काही कर्मचारी हे बदलापूर, विरार, वसई अशा भागातून येणारे आहेत. त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी वेळेत पोहोचू शकत नाहीत. यामुळे निकालाच्या कामावर परिणाम झाल्याचे समजते.