देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाचे ‘बुरे दिन’ काही संपायचे नाव घेत नाहीयेत. २०१४ पासून सुरु झालेली काँग्रेस पक्षाची राजकारणातील पडझड अजून थांबलेली नसताना, काँग्रेस नेत्यांची इतरत्रही पडझड होताना दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या एका आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते हे बैलगाडीवरून कोसळताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा भार आता प्राण्यांनाही सहन होत नाही अशाप्रकारचा टोला सोशल मीडियातून लगावला जात आहे.
शनिवार, १० जुलैचा हा व्हिडिओ आहे. मुंबई काँग्रेसच्या एका स्थानिक आंदोलनातला हा व्हिडिओ आहे. सध्या देशभर वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतींच्या विरोधात मुंबई काँग्रेस आंदोलन छेडले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे या आंदोलनाचे नेतृत्व करताना दिसत आहेत. वर्षाचे ३६५ दिवस आपल्या महागड्या गाड्यांमधून फिरणारे काँग्रेस पक्षाचे नेते या आंदोलनाच्या निमित्ताने बैल गाडी वर चढले. पण आपल्या आलिशान गाड्यांमधून फिरण्याची सवय असलेल्या या नेत्यांना बहुदा बैलगाडीचा अनुभव नसावा. त्यामुळे बैल गाडी किती वजन पेलू शकेल याचा अंदाज काँग्रेस नेत्यांना नव्हता. त्यामुळे बैलगाडीवर गर्दी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा अतिरिक्त भार ती गाडी सोसू शकली नाही आणि मोडुन पडली. यामुळे काँग्रेसचे नेते हे चांगलेच आपटले.
यावरून आता सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते चांगलेच ट्रोल होत आहेत. या घटनेतला आणखीन एक योगायोग म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नावाचा जयघोष सुरु असतानाच ही बैलगाडी मोडुन पडली. त्यामुळे राहुल गांधी यांच्या कार्यकाळात जशी काँग्रेस मोडकळीस आली तशीच अवस्था त्यांचे नाव घेताच बैलगाडीचीही झाली असा चिमटा नेटकरी काढताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारने राज्यात आणखी एक २६/११ घडवण्याची सुपारी घेतली आहे का?’
उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?
भारतीय जनता पार्टीनेही हीच संधी साधत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. मुंबई भाजपाने ट्विटरवर हा व्हिडो शेअर करत जोरदार टोलेबाजी केली आहे. “राहुल गांधी पंतप्रधान होणार ही कल्पना कोणत्या सुज्ञ माणसाला सहन होईल??? अहो माणसं सोडा, बैल सुद्धा बिथरले ही घोषणा ऐकून. राहुल गांधी या नावाचा महिमाच असा अगाध आहे…”
राहुल गांधी पंतप्रधान होणार ही कल्पना कोणत्या सुज्ञ माणसाला सहन होईल??? अहो माणसं सोडा, बैल सुद्धा बिथरले ही घोषणा ऐकून.😂😂😂
राहुल गांधी या नावाचा महिमाच असा अगाध आहे…🤓😂😀@RahulGandhi @INCIndia @INCMaharashtra #CongressMuktBharat pic.twitter.com/mU99PkNSrV— BJP MUMBAI (@bjp4mumbai) July 10, 2021