विधिच्या विद्यार्थी वर्गाला आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुन्हा एकदा गेल्यावर्षीचा अभ्यास करावा लागणार आहे. पदवी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गेल्यावर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रकल्प आता पुन्हा नव्याने करावे लागणार आहेत. अंतिम वर्षातील परीक्षा होऊनही अनेकजण आजही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. काहींनी पुढील शिक्षणासाठी काय करायचे याची तयारी सुद्धा केली होती.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे त्यांना पुन्हा एक पाऊल मागे येऊन आता परीक्षा द्याव्या लागणार आहेत. ठाकरे सरकार शिक्षणाच्या बाबतीत उदासीन आहे हे सत्तेत आल्यापासून आपण चांगलेच अनुभवले आहे. राज्यातील सर्वच परीक्षांचा गोंधळ ठाकरे सरकारने उडवलेला आहे. विधिच्या अंतिम परीक्षांचा गोंधळ आता अधिक वाढलेला आहे.
अंतिम परीक्षा देऊन अजूनही निकाल हातात न आल्यामुळे आता नोकरीसुद्धा गमवावी लागत आहे. अंतिम परीक्षेचा निकाल अजूनही न लागल्यामुळे अनेकजण आलेली नोकरीची संधी आता गमावत आहेत. चौथ्या सत्राचा अजून निकालही नाही, तसेच अंतिम परीक्षेचा निकालही नाही. त्यामुळे आता या सर्वांपुढे अनेक पेच उभे राहिले आहेत.
हे ही वाचा:
दहावीच्या शिक्षकांना आता जुंपणार निवडणुकांसाठी
ही बेसुमार वृक्षतोडणी कशासाठी?
‘या माणसाच्या शब्दावर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकतो का?’
गेल्यावर्षी अंतिम वर्ष परीक्षा केवळ घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे इतर सर्वांच्या परीक्षा या रद्द करण्यात आल्या. त्यामुळेच इतर सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून सरासरी मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय उच्चशिक्षण विभागाने घेतलेला होता. त्याचवेळी भारतीय विधिज्ञ परिषदेने सरासरी मूल्यांकन या प्रक्रियेवर विरोध दर्शवला होता. गेल्यावर्षी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची यंदा अंतिम वर्षाचीही परीक्षा झाली. मात्र, त्यानंतरही परिषदेने आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे आता विद्यापीठाला विधि अभ्यासक्रमाचे गेल्यावर्षी करण्यात आलेले सरासरी मूल्यमापन रद्द करण्याची वेळ आली आहे. गेल्यावर्षीचे मूल्यमापन रद्द करून विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विषयाचे दोन प्रकल्प करून त्याआधारे मूल्यमापन करावे अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
गतवर्षी राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला होता. उच्चशिक्षण विभागाने घातलेला हा गोंधळ अजूनही पुरता निस्तरला गेला नाही. तोपर्यंत आता विधि अभ्यासक्रमाचे नवीन कोडे सरकारने घातले. भारतीय विधिज्ञ परिषदेने विद्यार्थांच्या परीक्षा घेण्याची सूचना कायम ठेवल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पदवीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
राज्याने काढलेला एक निर्णय आणि विधिज्ञ परिषदेमध्ये नसलेल्या ताळतम्यामुळे यंदा पदवीपर्यंत टप्पा कसा पूर्ण करायचा असा विद्यार्थांना पेच पडलाय. या सत्रातील प्रत्येक विषयाचे दोन प्रकल्प सदर करावे लागणार आहेत. तसेच ३१ जुलै ही त्यासाठी अंतीम तारीख असणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. आता विद्यार्थांना पुन्हा मागच्या रद्द केलेल्या परीक्षा द्याव्या लागणार असल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.