आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला कौरवाची उपमा दिली आहे. ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रांगणात मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. पांडवांनी कौरवांना केवळ सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोका एवढीही जागा देणार नाही, असं दुर्योधन म्हणाला होता. याचा अर्थ काय होतो, दुर्योधनाचा अहंकार शिगेला पोहोचला होता. दुर्योधनाच्या अहंकारासारखाच ठाकरे सरकारचा अहंकारही शिगेला पोहोचला आहे. डोक्यात अहंकार घेऊन आलेले हे सरकार आहे. त्यामुळे दुर्योधन कोण? दु:शासन कोण? आणि भीष्म पितामह कोण? हे तुम्हीच ठरवा, असं फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं
भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही
सत्ता डोक्यात जाते तेव्हा विरोधी पक्षाची गरज राहत नाही. मी मुख्यमंत्री असताना असे तणावाचे प्रसंग आले. त्यावेळी मी स्वत: जाऊन चर्चा करायचो. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं समजून घ्यायचो. आता कोणीही चर्चा करण्यासाठी आलं नाही. कारण डोक्यात सत्ता गेली आहे. सत्ता डोक्यात गेलेले असे लोक अधिक काळ टिकत नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, १२ आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.