दक्षिण मुंबईतील गँगस्टर आणि ड्रग्स माफिया सोनू पठाण याला मैत्रिणीची भेट चांगलीच महागात पडली आहे. अनेक महिन्यापासून अटकेच्या भीतीने लपून बसलेला सोनू पठाण हा रविवारी मैत्रिणीला भेटायला पायधुनी येथे आला आणि एनसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला. सोनू पठाणच्या मागावर असलेल्या एनसीबीने पठाण याला डोंगरी ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.
मोहम्मद जमान हिद्दुउल्ला खान उर्फ सोनू पठाण असे या गँगस्टरचे नाव आहे. सोनू पठाण हा दक्षिण मुंबईतील गँगस्टर असून अंडरवर्ल्डशी त्याचा संबंध आहे. ड्रग्सच्या धंद्यात उतरलेला सोनू पठाण हा डोंगरी येथील ड्रग्स माफिया आरिफ भुजवाला याचा साथीदार आहे.
हे ही वाचा:
भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!
तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं
ठाकरे सरकारचा धोरणलकवा विद्यार्थ्यांच्या मुळाशी
भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही
एनसीबीने काही महिन्यांपूर्वी एकेकाळचा कुख्यात डॉन करीम लाला याचा नातू चिंकू पठाण याला नवी मुंबईतून ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. त्याच्या चौकशीत आरिफ भुजवाला डोंगरी येथे चालवत असलेल्या ड्रग्सच्या फॅक्टरीची माहिती एनसीबीला मिळाली होती.
एनसीबीने डोंगरी येथे आरिफ भुजवाला याचा ड्रग्सचा कारखान्यावर छापा टाकून संपूर्ण ड्रग्सचा कारखाना आणि प्रयोगशाळा उध्वस्त केली आहे. या प्रकरनातील मास्टरमाईंड आरिफ भुजवाला हा फरार झाला होता. आरिफ भुजवाला याने कनेक्शन अंडरवर्ल्डशी असल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच एनसीबीने आरिफ भुजवाला याला राजस्थान मधून अटक करून मुंबईत आणले होते.
या प्रकरणात सोनू पठाण याचा महत्वाचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेत असताना सोनू हा रविवारी मैत्रिणीला भेटण्यासाठी पायधुनी येथे येणार असल्याची माहिती मिळताच एनसीबीने सापळा लावून मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेला सोनू पठाण याला अटक केली. सोनू पठाण याच्यावर मुंबईत डझनभर गंभीर गुन्ह्याची नोंद असून एनसीबीमध्ये त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.