ममतांसमोर काँग्रेसची नांगी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन आठवड्यापूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पक्षात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी या पक्षाचे बडे नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी लोकसभेच्या नेतेपदी अन्य नेत्याची वर्णी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी काँग्रेसने चौधरी यांना बळीचा बकरा बनविण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासोबत अब्बास सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाही होता. या निवडणुकीत काँग्रेसने ममता बॅनर्जींवर एका शब्दानेही टीका केली नव्हती. काँग्रेसचा टीकेचा सर्व रोख भाजपाकडेच होता.
ममता बॅनर्जी यांच्याशी जुळवून घेण्यासाठी अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवण्यात येणार आहे. चौधरी हे बरहामपूरचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी सातत्याने तृणमूलवर टीका केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि चौधरी यांचं पटत नाही. ममता बॅनर्जी यांच्यासोबत भविष्यात आघाडी करायची असेल तर चौधरी यांना दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच काँग्रेसने या हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा:
ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार
वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप
या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही
ठाकरे सरकार अजून किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार?
दरम्यान, चौधरी यांच्या जागेवर लोकसभेच्या नेतेपदी कुणाला बसवायचं याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही. तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरुर आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनिष तिवारी यांच्याकडे ही सूत्रे दिली जाऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. लोकसभेतील नेतेपद राहुल गांधी यांच्याकडे देण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. थरूर किंवा तिवारी यांचीच नियुक्ती या पदासाठी होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे.