वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांचे पेव काही केल्या थांबण्याची चिन्हे नाहीत. दररोज नवनवे व्हीडिओ समोर येऊ लागले असून त्यातून तिथे सुरू असलेली अमाप वृक्षतोड दिसू लागली आहे. या वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामांतून कोण वसुलीचे काम करत आहे, अनधिकृत बांधकामांसाठी कोण कुणाला पैसे पुरवत आहे, इथला सचिन वाझे कोण आहे, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.
या व्हीडिओतून निर्दयपणे झाडे तोडून तिथे अनधिकृत इमारती उभारण्यासाठी धावपळ केली जात असल्याचे दिसते आहे. आताच्या ताज्या व्हीडिओत विरार पूर्वेकडील आनंदीनगर भागात सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड दिसत आहे. मात्र ही वृक्षतोड अद्याप पालिका अधिकाऱ्यांच्या नजरेत आलेली नाही, याबद्दल स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारचा १५५ कोटींचा मीडिया घोटाळा?
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात कंत्राटदाराची चांदी?
‘१०० जीव वाचवायचे होते….’ असे लिहीत एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या
मागे येथील सहआयुक्त मोहन संखे यांचे स्टिंग केल्यानंतर त्यातून पालिका अधिकारी, अभियंते, राजकीय नेते यांचे कसे साटेलोटे आहे, याचे घबाडच सापडले होते. संखे यांच्या बोलण्यात अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील, अभियंता स्वरूप खानोलकर आदिंची नावे आली होती. त्यानंतर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या संखे यांचीच बदली झाली. तर आशीष पाटील हे सुट्टीवर गेल्याचे सांगण्यात येत होते.
यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. पालिका अधिकारी दाखविण्यापुरते बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी जातात पण नंतर पुन्हा ही वृक्षतोड सुरू होते. शनिवारी यासंदर्भात पालिकेत तक्रार करण्यात आली, पण तात्पुरते काम थांबले. रविवारी सुट्टीचा दिवस हेरून पुन्हा वृक्षतोडीला प्रारंभ झाला आहे, असे एका स्थानिकाने ‘न्यूज डंका’ला सांगितले.