बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून खळबळ
राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली. तसेच स्थानिक भाजपा आमदार महेश लांडगे हेदेखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सध्या मंगल कार्यालयाबाहेर काही समर्थक ठिय्या देऊन बसले आहेत. ते भजन गात आहेत. यावर आता पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
“पायीवारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, वारीसाठी पायी निघालेल्या कराडकर समर्थकांनाही पोलिसांनी रोखलं. कोरोनाचा बागुलबुवा उभा करून वारीवर बडगा उगारणारी मुघलशाही महाराष्ट्रात प्रकटली आहे. ‘सदाघरी’ औरंगजेब राज्य करतोय.” असं ट्विट मुंबई भाजपानेही केलं आहे.
पायीवारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, वारीसाठी पायी निघालेल्या कराडकर समर्थकांनाही पोलिसांनी रोखलं…
कोरोनाचा बागुलबुवा उभा करून वारीवर बडगा उगारणारी मुघलशाही महाराष्ट्रात प्रकटली आहे. 'सदाघरी' औरंगजेब राज्य करतोय.@OfficeofUT #जनाबसेना pic.twitter.com/yU1oJEeEWR— BJP MUMBAI (@bjp4mumbai) July 3, 2021
वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले होते.
हे ही वाचा:
दिनो मोरिया मुंबई महापालिकेतील सचिन वाझे
अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स
भारतीय सैन्याला मिळाली नवी ब्रिजिंग सिस्टिम
औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी विचारला.