विरोधकांकडून ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मूळ गावी मूल येथे आज आले होते. परत जाताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर घडविले जात आहे, असा आरोप होतोय. त्यात कितपत तथ्य आहे? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
राज्य सरकारने इम्पिरीकल डेटा गोळा करण्याचे काम ओबीसी आयोगाला दिलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संबंधाने राज्याची याचिका कायम असून हा प्रश्न मागासवर्ग आयोगाकडे द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा:
व्हीप बजावल्यानंतरही आमदारांना थेट फोन करण्याची वेळ का आली?
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी ६ जुलैला
सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू
राज्यातील आघाडी सरकार जन्माला आल्यापासून अस्थिर आहे. ही अनैसर्गिक युती आहे. विषम युती आहे. जनतेलाही ही युती मान्य नाही. त्यामुळे जनता २०२४च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहे. या सरकारमध्येच वाद आहेत. त्यामुळेच ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच आम्ही सरकार पाडण्याचा दावा कधीच केला नव्हता. आमच्या कोणत्याही नेत्याने असं विधान केलं नाही. गेल्या सहा महिन्यात तर नाहीच नाही, असा दावा रावसाहेब दानवे यांनीही केला.