कॅनडामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तेथील नागरिक हैराण झाले आहे. कॅनडासोबतच अमेरिकेतील नागरिक देखील या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. या भागातील पारा आता पन्नाशीच्या जवळ पोहोचत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात सध्या आलेल्या उष्णतेच्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्युमध्ये वाढ झाली आहे.
कॅनडामध्ये तर तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला आहे. मंगळवारी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया येथील लिटन गावात पाऱ्याने ४९.५ अंश सेल्सियस एवढी विक्रमी नोंद केली. उष्णतेमुळे व्हँकूव्हर भागात तब्बल १३४ लोकांचे मृत्यु झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हँकूव्हरने यापूर्वी अशा प्रकारची उष्णता कधीच अनुभवली नव्हती.
हे ही वाचा:
अशा भ्याड हल्ल्याने बहुजन समाज घाबरणार नाही
कोस्टल रोडच्या कामात खोडा घालणाऱ्यांना खडे बोल
पडळकरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भाजपा नेते आक्रमक
अमेरिकेत देखील उष्णतेच्या लाटेने लोकांना हैराण केले आहे. अमेरिकेतील सिएटल शहरात उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. उष्माघातामुळे ६० ते ६५ वयोगटातील दोन नागरिकांचा मृत्यु झाला. कॅलिफोर्निया परिसरातील लोकांमध्ये उष्णता आणि कोरडेपणामुळे वणवा पेटण्याची भिती निर्माण झाली आहे.
कॅनडा आणि अमेरिकेत उद्भवलेली ही परिस्थिती पर्यावरणीय बदलांचे द्योतक असल्याचे काही पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यामते पर्यावरणीय बदलांमुळे अशा प्रकारचे टोकाचे तापमान गाठले जाण्याच्या घटनांच्या वारंवारतेत वाढ झाली आहे. त्याबरोबरच काहींनी सध्या कॅनडापेक्षा दुबई थंड असू शकते असे देखील म्हटले आहे.