राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या पाच आणि सहा जुलैला होत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. हे पद रिक्त असल्याने भाजपाने थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवड कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल आणि याच अधिवेशनात निवड होईल अशी माहिती दिली. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. निवडणूक घेण्यास तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा. काँग्रेसने त्यांचा उमेदवार ठरवावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं शरद पवार म्हणाले.
ज्यावेळी आम्ही सरकार बनवलं, त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचं ठरलं. ती काँग्रेसची जागा आहे. त्याची निवडणूक घ्यायची असेल तर तिन्ही पक्षांनी निर्णय घ्यावा, काँग्रेस देईल तो निर्णय सिलेक्ट करावा, असं शरद पवार म्हणाले.
नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा:
दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?
गुलशन कुमारचा मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही
कम्युनिस्ट उत्तर कोरियावर उपासमारीची वेळ
कोस्टल रोडच्या कामात खोडा घालणाऱ्यांना खडे बोल
काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.