यंदाची आषाढीची पायी वारी कोणत्याही परिस्थितीत होणार म्हणजे होणारच. सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या ठाकरे सरकारने वारकऱ्यांची मागणी धुडकावली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा भाजपाप्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूरच्या पायी वारीवर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश देण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात संचारबंदी लागू होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली. पण सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी पुढील परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. पायी वारी ही कोणत्याही परिस्थितीत होणारच. सविनय कायदेभंग काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल, असेही तुषार भोसले यांनी सांगितले.
आषाढी एकादशीसाठी मानाच्या १० पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या १९५ संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.
हे ही वाचा:
आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार
आरबीआची चार बड्या सहकारी बँकांवर मोठी कारवाई
कोवॅक्सिन अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी
यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा भाजपाप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला होता.
हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असे तुषार भोसले यांनी म्हटले.