जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांना मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरच्या मलूरा पारींपोरा भागात कालपासून धूमश्चक्री सुरु होती. त्यात जवानांनी लष्कर ए तैय्यबाचा टॉपचा कमांडर नदीम अबरार याला यमसदनी पाठवलंय. त्याबरोबरच इतर दोन अतिरेक्यांनाही ठार मारण्यात आलंय. याच एन्काऊंटरमध्ये सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्यासह दोन जवानही जखमी झालेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर बारामुल्ला सीमेवर झालेल्या अनेक हत्या आणि दशहतवादी कारवायांमध्ये अबरारचा सहभाग होता.
जम्मू काश्मीरचे आयजीपी विजयकुमार यांनी सांगितलं की, काही दहशतवादी हायवेवर हल्ला करणार आहेत अशी माहिती आली होती. त्याच पार्श्वभूमीवर हायवेवर जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं नाकेबंदी केली. पारींपोर नाक्यावर एक गाडी अडवली आणि त्यांना ओळख विचारली गेली. त्याच वेळेस गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या तसच मास्क घातलेल्या व्यक्तीनं स्वत:ची बॅग उघडण्याचा प्रयत्न केला आणि ग्रेनेड काढला. त्याच वेळेस नाक्यावरच्या टीमनं त्या व्यक्तीला तात्काळ पकडलं.
ताब्यात घेण्यात आलेल्या गाडीचा ड्रायव्हर आणि मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणलं गेलं. तिथं आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला गेला तर तो लष्कर ए तैय्यबाचा टॉपचा कमांडर अबरार होता. त्याला मग जेकेपी, सीआरपीएफ आणि सैन्याच्या संयुक्त टीमनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि इंटरोगेशन सुरु केलं. त्याच चौकशीत त्यानं सांगितलं की, मलुरातल्या एका घरात त्यानं एके-४७ रायफल ठेवलेली आहे.
अबरारच्याच माहितीवर सुरक्षा जवानांनी मलूरच्या त्या घराची, भागाची नाकाबंदी केली. अबरारलाही त्या घरात नेण्यात आलं. त्यावेळेस त्या घरात लपून बसलेल्या अबरारच्याच एका साथीदार दहशतवाद्यानं जवानांवर गोळीबार सुरु केला. अबरारनं मात्र सुरक्षा जवानांना ही माहिती दिली नव्हती. त्यामुळे जवानांसोबत धोका झाला. सुरुवातीच्या चकमकीत सीआरपीएफचे ३ जवान जखमी झाले. तर त्याच चकमकीत नदीम अबरारसोबतही चकमक झाली.
हे ही वाचा:
‘हा’ अपमान पुणेकर लक्षात ठेवतील
चीनी सीमेवर भारताने तैनात केले ५० हजार जवान
बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा
नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका
जखमी जवानांना बाहेर काढलं गेलं. नंतर नव्या टीमनं चकमकीची जबाबदारी सांभाळली. जेकेपी, सीआरपीएफनं पुन्हा त्या घराची एकदम कडक नाकेबंदी केली. नंतर झालेल्या फायरिंगमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला. तसच त्याच फायरींगमध्ये नदीम अबरारही ठार झाला. घटनास्थळावरुन दोन एके-४७ रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. अजूनही त्या भागात सर्च ऑपरेशन सुरुच आहे.