महाराष्ट्रात काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. या दरम्यान अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूर आणि नागपुरातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज कोणत्याही परिस्थितीत इतर सर्व दुकानं उघडणार असा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
पुण्यात आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. आजपासून (२८ जून) पुणेकरांना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.
हे ही वाचा:
ओवैसी उत्तर प्रदेशात शंभर जागांवर निवडणूका लढवणार
कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ७६ दिवसांनी हजाराच्या आत
पुदुचेरीला मिळाली पहिली महिला मंत्री
‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले
तर दुसरीकडे नागपुरातही व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र आहे. नागपुरात आजपासून नवीन निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आज सकाळपासून लगबग पाहायला मिळत आहे. आजपासून बाजार ४ वाजता पर्यंतच सुरू राहणार असल्याने अनेक व्यापारी सकाळी लवकर दुकानात पोहोचले आहेत.
नागपुरात सकाळी ११ च्या दरम्यान उघडणारा बाजार आज सकाळी उघडायला सुरुवात झाली आहे. वेळ कमी असल्याने व्यापाऱ्यांना लगबग करावी लागत आहे. या निर्बंधांमुळे व्यवसाय करायला कमी वेळ मिळत आहे. हे निर्बंध ५ जुलैपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे व्यापारी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.