महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती हाताळायला अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने कोविड नियोजनाचा पार खेळखंडोबा केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार राज्यातले निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. कोविडच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा वाढता धोका दर्शवत ठाकरे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने काढलेल्या नव्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लागू होणार आहेत. या आदेशात असे म्हटले गेले आहे की आठवड्याचा पॉझिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बदलता राज्यात सर्वत्र तिसऱ्या स्तरावरील निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार राज्यातील सर्व अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापनांना सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंतच परवानगी असेल. तर अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने आणि आस्थापने ही सोमवार ते शुक्रवार हे आठवड्याचे पाचच दिवस संध्याकाळी ४ पर्यंत चालू ठेवायला परवानगी असणार आहे. तर जिल्ह्याची स्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार असणार आहेत.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात
मुंबई-ठाण्यातल्या बनावट लसीकरणाचा पर्दाफाश
शिवसेना म्हणजे ‘बेकायदेशीर बंगलो’ सेना
कोरोनाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ जोडे मारण्याच्या लायकीचे!
राज्यात लागू करण्यात आलेल्या या नव्या तिसऱ्या स्तरातील निर्बंधांच्या अनुसार रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स हे संध्याकाळी ४ पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. पण फक्त ५०% क्षमतेनेच. तर विकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात सध्या कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरियंटने शिरकाव करून त्याचे थैमान वाढत चालले आहे. त्याचीच खबरदारी म्हणून सरकारकडून हे निर्बंध लादले गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राज्यात डेल्टा व्हेरियंटचे २१ रुग्ण आढळले आहेत. तर त्यापैकी ८० वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.