रेल्वेमधील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेमध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आता समोर आलेले आहे. मोबाईल फोन चोरून नेताना चोराशी प्रतिकार करताना ४८ वर्षांचा एक इसम गंभीर जखमी झाला.
मंगळवारी घडलेल्या घटनेत दक्षिण मुंबईतील कपड्यांच्या कंपनीत नोकरी करणारा आणि विरार येथे राहणारा देवेंद्र पारेख हा सकाळच्या सुमारास लोकलमधून जात होता. ट्रेन प्रभादेवी स्थानकातून जायला निघाली तसतसे एका व्यक्तीने दुस-या श्रेणीच्या डब्यात प्रवेश केला. पारेख पॅसेजजवळ बसले होते. त्या माणसाने त्याचा हँडसेट हातातून खेचून घेतला. पारेख यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताना, त्या चोराने त्यांना गाडीतूनच खाली खेचले. पारेख यांना गाडीतून या चोराने खाली खेचून लगेच तेथून पळ काढला, अशी माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी दिली. ट्रेनने वेग पकडल्यामुळे पारेख यांना तोल सांभाळता आला नाही आणि ते रुळावर पडले. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडले. गौरवकुमार सिंग (वय २४) असे त्याचे नाव आहे. पारेख यांचा फोन त्याच्याकडून जप्त करण्यात आला.
हे ही वाचा:
विधिच्या विद्यार्थ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ
महापालिकेने घेतला घोटाळ्याचा ‘आश्रय’
ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलच गुरु
भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी
पारेख यांना नायर इस्पितळात नेण्यात आले. तेथे गुडघे, खांदे, कपाळावर आणि ओठांना दुखापत झाल्याने काही तास उपचार घेतले. पारेख यांनी शुद्धीमध्ये रेल्वे पोलिसांकडे आपली तक्रार नोंदवली.
पकडण्यात आलेला चोर गौरवकुमार याच्यावर याआधी सुद्धा काही गुन्हा दाखल करण्यात आला होता की नाही याची तपासणी केली पण कोणताही रेकॉर्ड सापडला नाही. तो अँटॉप हिल येथे चाळीत राहतो अशी माहिती इनामदार यांनी दिली. त्याच्यावर आयपीसीच्या कलम 392 अंतर्गत दरोडेखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल चोरीच्या घटना दिवसागणिक शहरामध्ये वाढत आहेत. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात महिलांचे मोबाईल पळवण्याचे प्रकारही वाढत आहेत.