राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आलेले असतानाही राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकार विरोधात भाजपाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त ओबीसी समाजाचे उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या संबंधीची घोषणा केली आहे.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाचे शिष्टमंडळ बुधवार, २४ जून रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटले. यावेळी त्यांनी राज्याच्या अनेक महत्वाच्या विषयांना अनुसरून राज्यपाल महोदयांना निवेदन दिले आहे. यात राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर कोणत्याही प्रकारच्या निवडणूका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी भाजपाने केली आहे.
या राज्यपाल भेटीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ओबीसींचे आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे, सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळे, मागासवर्गीय अयोग तयार न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले. त्यामुळे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात पहिल्यांदा ओबीसींना कुठल्याही प्रकारचे राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलेले नाही असा घणाघात फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा:
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?
निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन
भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी
हे आरक्षण पूर्ववत होईपर्यंत स्थाराज्यात कुठल्याही निवडणूका घेऊ नयेत अशी मागणी भाजपाने केल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारनी हे मान्य केले पण तरीही राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात पाच जिल्हा परिषद आणि त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत ज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण नसेल.
राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करत अधिवेशन गुंडाळू बघताय पण मग निवडणुकीत कोरोना नाही का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. कोरोना आहे तर प्रचार कसा करायचा? त्याने कोरोना वाढणार नाही का? असे विचारत राज्य सरकारने दुटप्पी वागणे बंद केले पाहिजे असे फडणवीस म्हणाले. तर याच वेळी त्यांनी राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना आव्हान दिले आहे. ‘सरकारमधील जे मंत्री आम्ही ओबीसींचे हितेशी आहोत असा आव आणत असतात त्यांना हे आव्हान आहे. राज्य सरकारला अधिकार आहेत की ते निवडणुका पुढे ढकलू शकतात. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात आणि जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर निवडणुका घेतल्या जाऊ नयेत.’ असे फडणवीस म्हणाले.
भाजपा ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेच पण जर सरकार निवडणूका पुढे ढकलत नसेल, सरकारचा यात डाव असेल तर भाजपा या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवारच देईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. तसा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीत झाल्याचे त्यांनी सांगितले. तर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोवर भाजपा शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.
ज्या जागांवर निवडणुका होतील, तेथे आमचा उमेदवार विजयी होईल की नाही, याचा कोणताही विचार न करता केवळ आणि केवळ ओबीसी समाजातूनच उमेदवार देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. ओबीसी आरक्षणासाठी आमचा लढा अखेरपर्यंत सुरू राहील.#OBC #OBCreservation pic.twitter.com/CV89IMu6vo
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 23, 2021