न्यूझीलंड हा पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप स्पर्धेच्या विजयाचा मानकारी ठरला आहे. भारतीय संघाचा ८ गडी राखून दणदणीत पराभव करत न्यूझीलंड संघाने टेस्ट चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले आहे. कर्णधार केन विलियमसन हा या विजयाचा शिल्पकार ठरला. विलियमसनने संयमी फलंदाजीचा आणि जबाबदार नेतृत्वाचा उत्तम नमुना दाखवतात न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला.
जगभर पसरलेले कोविडचे सावट, पाऊस, खराब प्रकाश, अशा अनेक संकटांवर मात करत आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पूर्णत्वास गेला आणि जगाला पहिला वाहिला टेस्ट चॅम्पियन देऊन गेला. ‘ब्लॅक कॅप्स’ किंवा ‘किवीज’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या न्यूझीलंड संघाने हा बहुमान मिळवला. विजयासाठी अवघ्या १३९ धावांचे सोपे लक्ष्य घेऊन न्यूझीलंड संघ मैदानात उतरला होता. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ कुठेच डगमगलेला दिसला नाही. त्यांचे सलामीची दोन्ही फलंदाज स्वस्तात मागेही गेल्यानंतर कर्णधार केन विलियमसन आणि अनुभवी रॉस टेलर या दोघांनी संयमी खेळाचे अप्रतिम सादरीकरण करत संघाला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा:
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?
निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन
भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी
विलियमसनने ८९ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी करत एक अत्यंत महत्वाचे असे अर्धशतक झळकावले तर टेलरने १०० चेंडूत ४७ धावा करत त्याला मोलाची साथ दिली. त्या दोघांनी ९६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. तर भारताकडून चौथ्या डावात रविचंद्रन अश्विन हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन बळी टिपले.
सामन्याचा अखेरचा दिवस हा सुरवातीपासूनच न्यूझीलंडच्या नावे राहिला. सुरवातीला न्यूझीलंड संघाच्या भेदक गोलंदाजीसमोरही भारतीय संघाची चांगलीच धूळधाण उडाली. भारतीय संघाचे मधल्या फळीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. कर्णधार विराट कोहलीने १३ धावा केल्या, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. भारतीय संघाच्या फलंदाजांना प्रतिभेला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी अगदीच छोटे लक्ष्य होते, जे त्यांनी अगदी सहज साध्य केले. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कायल जेमिसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २ बळी घेतले होते. तर पहिल्या डावात २१ धावाही केल्या होत्या.