मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी म्हाडाची १०० घरे ही कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांची राहायची सोय करण्यासाठी टाटा मेमोरियल ट्रस्टला देण्याच्या सरकारी निर्णयाला स्थगिती दिली. पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच घेतला गेल्याचा गौप्य्स्फोट महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर या उपक्रमाचे चाव्या वाटप हे शरद पवार यांच्या हस्ते व्हावे हे देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनीच सुचवल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा नवे राजकीय वार-पलटवार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परळमधील टाटा रुग्णालयातील १०० कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. या उपक्रमात सरकारी हस्तक्षेप टाळण्यासाठी या १०० घरांचे व्यवस्थापन संपूर्णपणे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच करणार असल्याचेही निश्चित झाले होते. परंतु, या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी मंगळवार, २२ जून रोजी स्थगिती दिली.
हे ही वाचा:
मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांची ९३७१ कोटींची संपत्ती ईडी बँकांना देणार
नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईकांचे नाव देण्याचीही मागणी
निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन
ठाकरे सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु
शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्या मागणीनंतर हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. चौधरी हे शिवडी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार आहेत. ज्या म्हाडा वसाहतीतील घरे कॅन्सर रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली होती ती इमारत चौधरी यांच्या मतदारसंघातील आहे. इमारतीतील इतर रहिवाश्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. या निर्णयाच्या विरोधात इमारतीतील ७५० नागरिकांनी आवाज उठवत कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाच्या भोईवाडा येथील इमारतीत घरे आरक्षित केली जावीत अशी मागणी केली आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता मुख्यमंत्र्यांनी हा स्थगितीचा निर्णय घेतला आहे.