विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींचं रद्द केलेल्या अतिरिक्त आरक्षणानंतर या निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपा उग्र आंदोलन करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं. त्यानंतर राज्य सरकारने वारंवार आश्वस्त करुन याबाबत कारवाईचं आश्वासन दिलं. ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की निवडणुका होऊ देणार नाही, आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या निवडणुका जाहीर होतात, हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करुन या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत. या निवडणुका रद्द केल्या नाहीत तर उग्र आंदोलन भाजप करेल, असा इशारा मी राज्य सरकारला देतोय. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचा विश्वासघात बंद करा, असं माझं राज्य सरकारला आवाहन आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांची ९३७१ कोटींची संपत्ती ईडी बँकांना देणार
नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईकांचे नाव देण्याचीही मागणी
काँग्रेस पाठोपाठ ठाकरे सरकारमधील ‘हा’ पक्ष स्वबळावर
ठाकरे सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु
सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १९ जुलै रोजी मतदान होणार असून २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.