उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जमलेली गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना चांगलीच महागात पडली आहे. या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली आहे. जगताप यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी ठरु शकते, असं सांगत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानंतर जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयाच्या उद्घाटनाला कार्यकर्त्यांची झालेली गर्दी कोरोना नियमांची पायमल्ली करणारी होती. अजित पवारांच्या उपस्थितीत ही गर्दी झाल्यामुळे भाजप नेते त्यावर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश गेला. ही गर्दी अजितदादांच्या इमेजला धक्का देणारी ठरली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी थेट अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अजित पवार यांनी या गर्दीबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. अशा पद्धतीनं गर्दी करायला नको होती, असं अजितदादा म्हणाले होते.
हे ही वाचा:
योग दिनानिमित्त एम. योगा अॅप लॉन्च
मोदी सरकार आजपासून सर्व नागरिकांना मोफत लस देणार
कोरोना रुग्णसंख्येचा ८८ दिवसांचा नीचांक
लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी
“मला प्रशांतने १० तारखेला सांगितलं होतं की या कार्यक्रमाला भेट द्या, माझ्या स्वत:च्या मनामध्ये होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करावं. पण सध्याचं एकंदरीत वातावरण, नियम, लोकांची उपस्थिती पाहता तसं केलं नाही. आम्ही लोकांची गर्दी होईल म्हणून सकाळी ७ वाजतादेखील उड्डाणपुलांचे उद्घाटन केलेली आहेत. अगदी तसंच सकाळी सातला उद्घाटन केलं असतं तर कार्यक्रमाला लोकं मर्यादित आली असती” असा दावा अजित पवार यांनी केला.