युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ग्रुप ऑफ डेथ अर्थात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या ग्रुप एफ मधील चार संघ शनिवारी एकमेकांना भिडले. यामध्ये स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याच्या पोर्तुगाल संघाला बलाढ्य जर्मनी संघाने धुळ चारली आहे. तर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या हंगेरीने फ्रान्स समोर आव्हान उभे करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
शनिवार, १९ जून रोजी युरो कप फुटबॉल स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यामुळे फुटबॉल रसिकांचा वीकेंड रंजक बनला. जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या जर्मनी विरुद्ध पोर्तुगाल या फुटबॉल सामन्यात जर्मन संघाने पोर्तुगालचा दारुण पराभव केला आहे. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ करणाऱ्या जर्मन संघाने आपला हेतू सुरूवातीलाच स्पष्ट केला होता. सातत्याने त्यांच्याकडून पोर्तुगालच्या गोल पोस्टवर हल्ले चढवले जात होते. पण सामन्याच्या १५ व्या मिनिटाला अप्रतिम अशा काऊंटर अटॅकवर पोर्तुगाल संघाने क्रिस्तियानो रोनाल्डोच्या मार्फत आपला पहिला गोल नोंदवला. पण तरीही जर्मन संघाने आपला आक्रमक खेळ थांबवला नाही. ते सातत्याने गोल करण्याची संधी शोधत होते. याचाच परिणाम म्हणून सामन्याच्या ३५ आणि ३९ व्या मिनिटाला गोल करण्यात जर्मन संघाला यश आले. पण या दोन्ही वेळेस पोर्तुगीज खेळाडूच्या संपर्काने बॉल नेटमध्ये गेल्यामुळे हे दोन्ही गोल हे स्वयंगोल देण्यात आले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार
काँग्रेसला पुन्हा स्वबळाची आठवण
अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ
स्विस बँकेतील काळ्या पैशाचे वृत्त सफेद झूठ
मध्यंतरानंतर सामन्याच्या उत्तरार्धातही जर्मनीकडून सातत्याने आक्रमण सुरू ठेवले गेले. याचाच परिणाम म्हणून सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला काय
हॅवर्ट्झ याने जर्मन संघासाठी गोल नोंदवला. तर ६० व्या मिनीटाला रोबिन गोसेन्स याने गोल करत जर्मनीला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याचा ६७ व्या मिनिटाला रोनाल्डोच्या असिस्टवर डिएगो जोटा यांनी पोर्तुगालसाठी दुसरा गोल केला. यामुळे पोर्तुगीज चाहत्यांच्या आशा थोड्या पल्लवित झाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांना सामन्यात वापसी करण्यात यश आले नाही. पोर्तुगाल समोरचा विजय हा जर्मन संघासाठी मोठा कमबॅक ठरला आहे. करण या आधी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स समोर त्यांना पराभव पत्करायला लागला होता.
तर शनिवारच्या पहिल्या सामन्यात हंगेरी आणि फ्रान्स यांच्यात अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. या सामन्यात पहिल्या हाफचा खेळ संपता संपता हंगेरीने गोल करत धक्कादायकरित्या आघाडी नोंदवली. पण सामन्याच्या उत्तरार्धात ६६ व्या मिनिटाला गोल करत अँटोनियो ग्रिझमनने फ्रान्सला बरोबरी साधून दिली. पण विजयी आघाडी घेण्यात त्यांना अपयश आले. शनिवारच्या या दोन्ही निकालांमुळे युरो कप फुटबॉल स्पर्धेतील ग्रुप एफ मधील चुरस आणखीनच वाढली आहे.