राज्यात तीन पक्षांचे सरकार असले आणि आम्ही एकत्र आहोत असे त्यांच्याकडून वारंवार सांगितले जात असले तरी स्वबळाची भाषाही त्यांच्याकडून अधूनमधून केली जात आहे. आम्हाला तिसरा पक्ष म्हणतात अशी खंत व्यक्त करत आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम अशी भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आता केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या, असा आग्रह भाई जगताप यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.
राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंतप्रधान करायचंच असा निश्चय काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यासंदर्भातील कार्यक्रमात बोलताना आम्हाला तिसरा पक्ष म्हटलं जातंय, अशी खंत भाई जगतापांनी व्यक्त केली. येत्या निवडणुका या आम्हाला स्वबळावर लढू द्याव्यात अशी मागणी त्यांनी प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने स्वबळाचा नारा देत सरकारमधील बाकीच्या पक्षांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवल्या जातील, असं काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेचाही सूर काहीसा तसाच होता. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष मात्र ‘एकला चलो’ चा नारा देत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी असे समीकरण जुळेल अशाही बातम्या समोर येत आहेत.
हे ही वाचा:
फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन
ठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय
शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा
महापुर टाळण्यासाठी अलमट्टी, हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग
सध्या काही निवडणुका नाहीत, त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी घट्ट असून हे सरकार पाच वर्षे टिकेल असं शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या. तर राष्ट्रवादीचेकडूनही तशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. त्या आधी शिवसेना खासदार संजय राऊतांनीही हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि महाविकास आघाडी बुलंद राहिल असं सांगितलं होतं.