फूटपाथवर प्रचंड मोठी रांग पाहून त्या रिपोर्टरने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. एवढी मोठी रांग कसली म्हणून तिला आश्चर्य वाटलं. गाडीचा ड्रायव्हर म्हणाला, दारूच्या दुकानाची रांग असेल. मग ती माहिती घेण्यासाठी गाडीतून उतरली आणि बूम सांभाळत तिने रांगेच्या दिशेने धूम ठोकली.
रांगेतील एका माणसाकडे ती गेली. बोटांपेक्षा अंगठ्यांची संख्या जास्त असलेला एक राकट इसम रांगेत उभा होता. गळ्यात सोन्याच्या जाड्याभरड्या चेन…तिने त्याला रांगेबद्दल विचारलं, पण त्याचे रोखून पाहणारे लालेलाल डोळे पाहून तिने विषय सोडला. पुढे बघते तर रांगेतल्या दोन बायका कचाकचा भांडत होत्या. त्यांच्या जवळ ती पोहोचली तर एक बाई म्हणाली, ए, तू आमच्यात पडू नकोस. नाहीतर खर्चा पानी देईन. ती बिचारी आवंढा गिळून पुढे सरकली. कुणाकडून माहिती मिळेल याची तिला उत्सुकता होती. पुढच्या इसमाने तोंडात गुटख्याचे पाकीट रिकामे केले, तेव्हाच ती त्याच्याजवळ पोहोचली. पण याला काही विचारायचे म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ गुटखा’ असा काहीतरी विचित्र अनुभव यायचा, हे ओळखून ती पुढे निघाली. शेवटी मजल-दरमजल करत ती एकाकडे पोहोचली.
तिने त्याला विचारले, अहो, कसली रांग आहे ही?
तो (मागे वळून बघत)- ओ बाई, या लायनीत सगळे एरियातले ‘भाई’ हाएत.
ती- भाई???
तो- काल तुमी वाचलं नाही का? सर्टिफाइड गुंड म्हणून की कायतरी छापून आलं होतं. मग माहिती काढली आणि आलो इथं. सकाळपासून रांगेत हाय. जाम गर्दी झालीय.
ती- अच्छा. अच्छा.. मग त्याचं काय?
तो- आता आमी इतकी वर्षं या शेत्रात संगर्ष केला. छातीवर गोळ्या झेलल्या… तुरुंगवास भोगला…फासावर जाण्याची पन तयारी केली… कुनी विचारेना. आमाला काय किंमतच नाय. पन ही बातमी वाचली आणि जीवात जीव आला. आपल्याला पन जर्दा मिळाला तर काय वाईट हाए.
ती- दर्जा म्हणायचंय का तुम्हाला?
तो- हो तेच काय ते.
ती- अच्छा. म्हणजे तुम्हाला आता ‘सर्टिफाइड’ असा दर्जा मिळणार तर!
तो- होय तर. किंबहुना मिळायला हवा. तो मिळाला तर टोल नाक्यावर वादावादी नको. कार्ड दाखवायचं की सुसाट निघायचं. पोलिस मागं लागलं की, दाखवलं कार्ड. अंगावर हात उचलायची हिंमतच होणार नाय. आणि हो. अकिल भारतीय सर्टिफाइड गुंड म्हणून आमी संगटना पण काढणार हाओत…
दात काढत तो हसला.
तिचे काम झाले होते. एक सनसनाटी बातमी तिच्या हाती लागली होती. रांगेला मागे टाकत ती पुन्हा गाडीकडे धावली.
मविआ
(अर्थात, महेश विचारे आपला)
महेश विचारे, आपले विचार पटले बुवा