कुलाब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिसला गळती लागली असून त्याची दुरावस्था झाली आहे. त्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.
विनायक मेटे यांनी आज कुलाबा कफ परेड येथे जाऊन शिवस्मारकाच्या कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या ऑफिसची आघाडी सरकारमुळे दुरावस्था झाली आहे. दीड वर्षात आघाडीचा एकही नेता या ऑफिसची पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. ऑफिसला गळती लागली आहे. पडझड सुरू आहे. कार्यालयात काहीच शिल्लक राहिलं नाही. हे कार्यालय सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विभागाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांचंच या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.
या कार्यालयाप्रमाणेच शिवस्मारकाचंही काहीही झालेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी गड-किल्ल्यांची माहिती मागवण्याचे काम सुरू केलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण स्मारकासाठी काहीच हालचाल सरकारकडून झालेली नाही. या सरकारला केवळ मते हवी आहेत. त्यांना स्मारकाच्या कामाचं काहीही पडलेलं नाही. याला मुख्यमंत्री ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा :
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट
अजित पवारांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
एक लाख कोरोनायोद्धे तयार करणार
येडियुरप्पा- जयंत पाटील का भेटत आहेत?
राज्य सरकारला थोडी जरी चाड असेल तर त्यांनी शिवस्मारकाचं काम पूर्ण करावं. मोदी सरकारने स्मारकाचं भूमिपूजन केलं म्हणून या कामात रस नाही का? की त्याचा राग आहे? सरकारने काम सुरू केलं नाही तर आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोणी आडवं आलं तर त्याला आडवं करण्याची आमची तयारी आहे, असं सांगतानाच स्मारकाचं काम वेळेत सुरू झालं नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.