सोशल मीडियावर महिलांना त्रास देणारा त्याच्यासोबत अश्लिल संभाषण करणाऱ्या हैदराबादच्या एका तरुणाला विनोबा भावे नगर पोलिसांनी हनीट्रॅपमध्ये अडकवून कल्याण येथून अटक केली आहे. या तरुणाने अनेक तरुणी आणि महिलांना सोशल मीडियावर त्रास देत त्यांच्या छायचित्रासोबत छेडछाड करून ती छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करीत होता. या प्रकारामुळे एका तरुणीने बदनामीच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता, अशी माहिती समोर येत आहे.
कुर्ला पश्चिम येथे राहणाऱ्या ३९ वर्षांच्या महिलेला आणि तिच्या मैत्रिणीची एक तरुण फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बदनामी करीत होता. या महिलेचे आणि तिच्या मैत्रिणीची अश्लिल छायाचित्रे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल करून त्याच्याशी अश्लिल संभाषण करण्यास भाग पाडत होता. त्याच्या या कृत्याला कंटाळून तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अखेर या प्रकरणी या महिलेने विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता हा तरुण हैदराबाद येथून हे सर्व कृत्य करीत असल्याचे उघडकीस आले. या तरुणीला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून मुंबईत बोलावून त्याला अटक करण्याची योजना आखली.
हे ही वाचा:
हमेल्सच्या स्वयंगोलच्या जीवावर फ्रान्स शिलेदार
ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळतंय
प्रतिज्ञापत्र सादर करा! सरकारच्या शुल्क नियंत्रण समितीला कोर्टाचा आदेश
विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे
या तरुणाचे सावज म्हणून पोलिसांनी तक्रारदार महिलेलाच तयार केले आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला मुंबईत बोलावून घेण्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार तक्रारदार महिलेने या तरुणासोबत चॅटिंग करत त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि त्याला भेटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानक येथे बोलावून घेतले.
हनीट्रॅपमध्ये अडकलेला हा तरुण महिलेला भेटण्यासाठी कल्याण येथे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली. अनिल नारायण पात्रोड (२६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मुलाचा नांदेड जिल्ह्यात राहणारा अनिल पात्रोड हा आचारी असून मागील काही वर्षे तो दुबई येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून नोकरी करीत होता. त्यानंतर तो भारतात आल्यानंतर हैदराबादला राहू लागला. हैदराबादमध्ये बसून सोशल मीडियावर महिला तरुणींना गाठून त्यांना त्रास देत होता, अशी माहिती पोलीसांनी दिली. ही कारवाई विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार, म. पो.नि.पाटील यांचे मार्गदर्शनाने पो उप. निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पथक यांनी पार पाडली.