अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी राजस्थानातील वैशिष्ट्यपूर्ण अशा गुलाबी रेतीजन्य खडकाचा वापर करण्यात येणार असल्यामुळे राजस्थानात या दगडांच्या खाणकामाला सुरूवात करण्यात येणार आहे. राजस्थान सरकारने अशा प्रकारच्या दगडाचे उत्पादन करणाऱ्या सुमारे ७० खाणी विकसित करण्याचे योजले असून, यातील दगडाचा वापर राम मंदिराच्या निर्माण कर्यासाठी केला जाणार आहे.
राजस्थानातील भारतपूर जिल्ह्यातील बंसी पहाडपूर येथील खाणींच्या इ-लिलावानंतर राज्याला सुमारे ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत बोलताना खाण आणि पेट्रोलियम विभागाचे अतिरिक्त मुख्य आयुक्त सुबोध अग्रवाल यांनी सांगितले की, आम्हाला याबाबत योग्य ती परवानगी मिळाली असून अधिक काही परवानग्या आणि इतर काही गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर आम्ही खाणींच्या लिलावाचे आणि विकासाचे काम चालू करू शकतो. त्यामुळे या भागातील अवैध खाणकामाला चाप लागून खाण क्षेत्राचा विकास होऊ शकेल.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक
सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?
कोरोना रुग्णसंख्येत ७५ दिवसांचा निचांक
शिवसेना आमदाराच्या स्टंटबाजीमुळे कंत्राटदाराचा जीव धोक्यात?
या बाबत विश्व हिंदु परिषदेने गुलाबी दगडाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण करण्याविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराच्या रेतीजन्य खडकाचे काम या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होणे अपेक्षित आहे. या ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर पर्यंत या मंदिराची पायाभरणी पूर्णत्वास जाईल. या मंदिराचा पाया ५० फूट खोल, ४०० फूट लांब आणि ३०० फूट रुंद आहे. त्यानंतर बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्याला डिसेंबरमध्ये सुरूवात होईल, ज्यात दगडाचे काम देखील केले जाणार आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्याला १५ मार्चपासून प्रारंभ झाला. त्यासाठी वैदिक पद्धतीने विधीवत पूजा देखील करण्यात आली होती. या संपूर्ण भव्य मंदिराचे बांधकाम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.