चेक रिपब्लिक विरुद्ध स्कॉटलँड सामना चेक रिपब्लिकने सहजरित्या आपल्या खिशात घातला आणि २ गुणांसह ग्रुप डी मध्ये पहिले स्थान पटकावले. चेक रिपब्लिकने स्कॉटलँड विरुद्ध २ गोल केले आणि दोन्ही गोल हे २५ वर्षीय पॅट्रिक शीक याने केले आणि आपल्या देशाला जिंकवून दिले.
१९८० पर्यंत चेकोस्लोव्हाकिया म्हणून सहभागी होणारा देश १९९३ पासून चेक रिपब्लिक नावाने फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला आणि चेक रिपब्लिक देशाची पहिली मोठी फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती युरो १९९६. या स्पर्धेसाठी ते नुसते पात्रच ठरले नाहीतर अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. पण अंतिम फेरीत त्यांना जर्मनीने २-१ असे हरवले आणि दुसऱ्या क्रमांकावर चेक रिपब्लिकला समाधान मानावे लागले आणि ही त्यांची युरो स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आजच्या सामन्यातही त्यांच्या फुटबॉल इतिहासाला साजेसा खेळ चेक रिपब्लिककडून बघायला मिळाला. खासकरून त्यांचा स्ट्रायकर जो त्यांचा मुख्य खेळाडू देखील आहे पॅट्रिक शीक याने २ गोल करत आपल्या देशाला विजय मिळवून दिला. दुसरा गोल तर त्याने जवळजवळ ३० यार्डावरून केला. या गोलमुळे चेक रिपब्लिकचा विजय निश्चित झाला.
दुसरीकडे स्कॉटलँड संघ सुद्धा तोडीस तोड होता. परंतु म्हणावी तशी छाप स्कॉटलँडला पाडता आली नाही. सगळ्यानांच अँडी रॉबर्टसन कडून अपॆक्षा होत्या पण संपूर्ण संघ एका खेळाडूवर मैदानात तग धरू शकत नाही हे पुन्हा लक्षात आले. ग्रुप डी मध्ये आता चेक रिपब्लिक पहिल्या स्थानावर आहे तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर. दोन्ही संघांकडे ३ ३ गुण आहेत पण गोल फरकामुळे चेक रिपब्लिकने आघाडी मिळवली आहे.